वॉर्नरने मला बॉलशी छेडछाड करायला भाग पाडलं, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा
सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नऊ महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरन बॅनक्राफ्टची शिक्षा संपत आहे. या दरम्यानच त्याने एक मोठा खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने बॉल टॅम्परिंग करायला भाग पाडलं होतं, असा खुलासा या बंदी भोगत असलेल्या खेळाडूने केलाय. संघातलं आपलं योगदान सिद्ध करण्यासाठी मी हे काम केलं, असं तो म्हणाला. दक्षिण […]
सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नऊ महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरन बॅनक्राफ्टची शिक्षा संपत आहे. या दरम्यानच त्याने एक मोठा खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने बॉल टॅम्परिंग करायला भाग पाडलं होतं, असा खुलासा या बंदी भोगत असलेल्या खेळाडूने केलाय. संघातलं आपलं योगदान सिद्ध करण्यासाठी मी हे काम केलं, असं तो म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
डेव्हिड वॉर्नरने मला सामन्यात बॉलशी छेडछाड करायला सांगितलं आणि त्या सामन्यात आम्ही ज्या परिस्थितीत होतो, ते पाहता मी तयार झालो, असं बॅनक्राफ्ट म्हणाला. संघातलं स्वतःचं योगदान सिद्ध करायचं असल्यामुळे हे काम केल्याचंही त्याने कबूल केलं.
बॉल टॅम्परिंग प्रकरणाला मी देखील जबाबदार आहे. कारण, त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. या चुकीची मोठी किंमत मला चुकवावी लागली आहे. माझ्याकडे पर्याय होता, पण मी मोठी चूक केली, अशी जाहीर कबुली बॅनक्राफ्टने दिली.
वॉर्नरचं ऐकलं नसतं तर संघाच्या हितापेक्षा स्वतःचं हित मोठंय असा समज झाला असता. म्हणून जे सांगितलं ते केलं, अशीही कबुली बॅनक्राफ्टने दिली.
स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बंदी घातल्यापासून ऑस्ट्रेलियाची अवस्था दयनीय झाली आहे. रँकिंगमध्येही ऑस्ट्रेलिया संघ घसरला आहे, शिवाय एकामागोमाग एक पराभव सहन करावा लागत आहे. येत्या तीन महिन्यात वॉर्नर आणि स्मिथ यांची शिक्षा संपणार आहे. तर बॅनक्राफ्टची शिक्षा संपत आली आहे.