कुलदीप-चहलमुळे जाडेजा-अश्विनवर वन डेतून घरी बसण्याची वेळ?
नागपूर : काळानुसार संघात नवे खेळाडू येतात आणि दिग्गज खेळाडूंना घरी बसावं लागतं. तसंच काहीसं रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या बाबतीत झालंय. जाडेजा सध्या संघात असला तरी त्याचं स्थान निश्चित नाही. कारण, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या रुपाने भारतीय संघाला दोन विश्वासू गोलंदाज मिळाले आहेत. पण या बाबतीत कुलदीपचं मत वेगळं आहे. अश्विन […]
नागपूर : काळानुसार संघात नवे खेळाडू येतात आणि दिग्गज खेळाडूंना घरी बसावं लागतं. तसंच काहीसं रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या बाबतीत झालंय. जाडेजा सध्या संघात असला तरी त्याचं स्थान निश्चित नाही. कारण, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या रुपाने भारतीय संघाला दोन विश्वासू गोलंदाज मिळाले आहेत. पण या बाबतीत कुलदीपचं मत वेगळं आहे. अश्विन आणि जाडेजाला बाहेर करण्यात आमचा काहीही वाटा नाही, आम्ही फक्त मिळालेल्या संधीचं सोनं केलं, असं त्याने सांगितलं.
कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी वन डे संघात त्यांचं स्थान निश्चित केलं आहे. दोघांच्या फिरकीने संघ व्यवस्थापनालाही निःशब्द केलंय. त्यामुळेच रवींद्र जाडेजा आणि अश्विन यांच्यासाठी वन डे संघाची दारं जवळपास बंद झाली आहेत. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर झाला आणि जाडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळाली. पण अश्विनप्रमाणेच जाडेजाचंही संघातलं स्थान अनिश्चित झालं आहे. दोघांनी संधी मिळेल तेव्हा कसोटीत चांगली कामगिरी केली खरी, पण दोघांना वन डे संघात कमबॅक करता आलेलं नाही.
अश्विन, जाडेजा विश्वचषकातून जवळपास आऊट?
अश्विनने अखेरचा वन डे सामना 18 जून 2017 रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो वन डे संघात संधी मिळण्याची अजून प्रतीक्षा करतोय. डिसेंबर 2018 मध्ये अश्विन शेवटची कसोटी खेळला. पण दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांपासून दूर रहावं लागलं. एकीकडे संधी मिळत नसताना दुखापतही अश्विनच्या मागे लागली आहे. त्यामुळे अश्विनची आगामी विश्वचषकात खेळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. संघ व्यवस्थापनाने विश्वचषकाच्या दृष्टीने संघ तयार करण्यासाठी अनेक पर्याय आजमावून पाहिले, पण या सर्व निकषांमध्ये कुलदीप यादव आणि चहल परफेक्ट ठरले आहेत.
रवींद्र जाडेजाच्या बाबतीतही तसंच आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला विश्वचषकासाठी संधी मिळायला हवी, असं अनेकांचं मत आहे. पण निवडकर्ते आणि संघव्यवस्थापनाचा चहल-कुलदीप जोडीवर जास्त विश्वास आहे. कारण, त्यांनी प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध केलंय. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर झाला आणि जाडेजाला अनेक दिवसांनी वन डे संघात संधी मिळाली. कसोटीत जाडेजाने चांगली कामगिरी केली असली तरी वन डेसाठी मात्र त्याला प्रतीक्षा करावी लागली. हार्दिक पंड्या विश्वचषकापूर्वी फिट झाल्यास जाडेजाला पुन्हा बाहेर बसावं लागू शकतं.
अश्विन-जाडेजा, की कुलदीप-चहल?
या प्रश्नावर जाणकारांचं वेगवेगळं मत आहे. कारण, कुलदीप-चहल यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं असं त्यांनी काहीही केलेलं नाही. तर दुसरीकडे अश्विनचा वन डेतील तत्कालीन फॉर्म पाहता, कुलदीप आणि चहलने जागा कधी घेतली ते समजलंही नाही. पण जाडेजाच्या बाबतीत संमिश्र मत आहे. तो गोलंदाजीसोबतच एक चांगला फलंदाजही आहे. शिवाय क्षेत्ररक्षणात त्याला तोड नाही. कुलदीप यादवही सध्या फलंदाजीवर भर देत असल्याचं त्याने सांगितलंय. अर्थातच कुलदीप-चहलला गोलंदाजीसोबतच फलंदाजीचीही गरज असल्याचे संकेत संघ व्यवस्थापनाकडून मिळाले असावेत.
अश्विनने 111 वन डे सामन्यांमध्ये 32.91 च्या सरासरीने 150 विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्येही त्याने अनेकदा चांगली साथ दिली आहे. 111 सामन्यातील 69 डावांमध्ये त्याने 86.98 च्या स्ट्राईक रेटने 675 धावा केल्या. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
वन डेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जाडेजानेही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 148 वन डे सामन्यांमध्ये जाडेजाच्या नावावर 171 विकेट आहेत. तर 148 वन डे सामन्यातील 98 डावांमध्ये त्याने 84.97 च्या स्ट्राईक रेटने 1990 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय क्षेत्ररक्षणामध्ये जाडेजाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.
कुलदीप यादवने गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 40 वन डे सामन्यांमध्ये त्याने 79 विकेट घेतल्या आहेत. या 40 वन डे सामन्यात कुलदीपला 14 डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. यामध्ये त्याच्या नावावर 78 धावा जमा आहेत.
यजुवेंद्र चहलनेही कुलदीपप्रमाणेच प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध केलंय. 40 वन डे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 71 विकेट आहेत. विशेष म्हणजे दोन सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी 6-6 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्याला फार काही करता आलं नाही. सहा डावांमध्ये त्याच्या खात्यात 34 धावा जमा आहेत.