पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, तातडीने रुग्णालयात हलवलं
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटी सामन्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यात चार […]
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटी सामन्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे.
कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यात चार दिवसांचा सराव सामना खेळवण्यात येत होता. मात्र तिसऱ्याच दिवशी सीमारेषेजवळ एक झेल टिपण्याच्या प्रयत्नात, पृथ्वी शॉच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
अश्विनच्या गोलंदाजीवर मॅक्स ब्रायन्टने एक फटका लगावला, तो झेलण्यासाठी पृथ्वी शॉ धावला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पृथ्वी शॉ मैदानातच कोसळला. पृथ्वी शॉ वेदनेने तळमळत होता. त्याची ती अवस्था पाहून संघाचे फिजीओ मैदानात धावत आले. पृथ्वी शॉला दोघांनी अक्षरश: उचलून ड्रेसिंग रुममध्ये घेऊन जावं लागलं. त्यानंतर पृथ्वी शॉला पुढील उपचारासाठी, पायाच्या स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आलं.
पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण भारताकडून सलामीसाठी पृथ्वी शॉची निवड निश्चित होती. मात्र आता त्याची दुखापत बरी न झाल्याने त्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं. पहिल्या कसोटीत आता सलामीसाठी मुरली विजय आणि के एल राहुल यांना उतरावं लागू शकतं.
सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे थांबला आणि दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात पृथ्वीने केएल राहुलच्या साथीने भारताकडून 66 धावा केल्या. शॉने 11 चौकांरासह, 69 चेंडूत 66 धावा केल्या. सराव सामन्यातील पृथ्वीच्या खेळीने त्याने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला होता. मात्र आता त्याच्या दुखापतीने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
कसोटी मालिका
पहिला सामना – 6 डिसेंबर
दुसरा सामना – 14 डिसेंबर
तिसरा सामना – 26 डिसेंबर
चौथा सामना – 3 जानेवारी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार