इंग्लंडकडून अपमानाचा बदला, आयर्लंडला फक्त 38 धावात गुंडाळलं
लॉर्ड्सवर झालेली चार दिवसांची ही एकमेव कसोटी इंग्लंडने 143 धावांनी जिंकली. आयर्लंडचा संघ 15.4 षटकात म्हणजे 94 चेंडूतच माघारी परतला. पहिल्या डावात इंग्लंडला फक्त 85 धावांवर गुंडाळण्यात आलं होतं.
लंडन : विश्वविजेत्या इंग्लंडची आयर्लंडने (England vs Ireland) कसोटीत दैना केल्यानंतर सोशल मीडियावर संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. पण इंग्लंडने दुसऱ्या डावात संयमी खेळी करत मोठं आव्हान उभं केलं आणि आयर्लंडला (England vs Ireland) फक्त 38 धावात गुंडाळत कसोटीत नवा विक्रम केलाय. लॉर्ड्सवर झालेली चार दिवसांची ही एकमेव कसोटी इंग्लंडने 143 धावांनी जिंकली. आयर्लंडचा संघ 15.4 षटकात म्हणजे 94 चेंडूतच माघारी परतला. पहिल्या डावात इंग्लंडला फक्त 85 धावांवर गुंडाळण्यात आलं होतं.
इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयात गोलंदाज ख्रिस वोक्सने 17 धावा देऊन सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या, तर स्टुअर्ट ब्रॉडने 19 धावा देऊन 4 फलंदाजांना माघारी धाडलं. त्यापूर्वी इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावात आटोपला होता. 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडला फक्त 38 धावा करता आल्या.
आयर्लंडच्या एकमेव फलंदाजाला दुहेरी अंक गाठता आला. जेम्स मॅक्कलमने 11 धावा केल्या. आयर्लंडने इंग्लंडला कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त 85 धावात गुंडाळलं होतं. यानंतर मैदानात उतरलेल्या आयर्लंडने पहिल्या डावात 207 धावा केल्या. 122 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात 303 धावा करुन मोठी आघाडी घेतली.
तिसरा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत असलेल्या आयर्लंडची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. कसोटीत एका डावात सर्वात कमी धावा करण्याच्या बाबतीत 38 हा पाचवा निचांकी आकडा आहे. कसोटीत सर्वात निचांकी धावसंख्येचा नकोसा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्ध 1955 मध्ये ऑकलंडच्या मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ 26 धावात गारद झाला होता.
कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या
न्यूझीलंड : 26 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1955 (ऑकलंड)
दक्षिण आफ्रिका : 30 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1896 (पोर्ट एलिजाबेथ)
दक्षिण आफ्रिका : 30 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1924 (बर्मिंघम)
दक्षिण आफ्रिका : 35 धावा , विरुद्ध इंग्लंड, 1899 (केप टाऊन)
दक्षिण आफ्रिका : 36 धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1932 (मेलबर्न)
ऑस्ट्रेलिया : 36 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1902 (बर्मिंघम)
आयरलंड: 38 धावा, विरुद्ध इंग्लंड, 2019 (लॉर्ड्स)