भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडीजला धक्का, आंद्रे रसेल विश्वचषकातून बाहेर
टक फलंदाज आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी सुनील आंब्रिसचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलाय.
लंडन : टीम इंडिया मँचेस्टरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी सराव करत आहे. मात्र वेस्ट इंडिजसाठी वाईट बातमी आहे. स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी सुनील आंब्रिसचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलाय. विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच रसेल गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. मात्र त्रास वाढल्याने तो मायदेशी परतणार आहे.
स्फोटक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने आंद्रे रसेलने आयपीएल गाजवलं होतं. मात्र त्याला स्वतःच्या देशासाठी खेळताना खास कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात त्याने केवळ 36 धावा केल्या आहेत, तर पाच विकेट्स त्याच्या नावावर आहेत. दुखापतीचा सामना करत खेळणं अखेर इथेच थांबलं आहे. उपचारासाठी रसेल आता मायदेशी रवाना होईल.
वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत घवघवीत यश मिळवलं नसलं तरी प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणण्यात यश मिळवलंय. नुकताच झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सामना थरारक झाला होता. अवघ्या काही धावांनी हा सामना विंडीजने गमावला होता. भारताविरुद्धच्या सामन्यात आता सुनीलचा समावेश करण्यात आलाय. सुनीलने सप्टेंबर 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तो फक्त सहा सामने खेळला असून नुकत्याच झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याने 148 धावांची विक्रमी खेळी केली होती.
27 तारखेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना होईल. 10 संघांच्या गुणतालिकेत भारत 9 गुणांसह तिसऱ्या, तर वेस्ट इंडिज 3 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मालिकेतलं आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजला विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. साखळी सामन्यांच्या अखेर गुणतालिकेतील टॉपचे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र असतील.