IND vs AUS | तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, 4 गडी गमवत पहिल्या डावात 47 धावांची आघाडी
तिसऱ्या कसोटीत सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा नावावर राहिला. भारतीय संघाला 109 धावांवर रोखलं. तसेच फलंदाजी करताना 47 धावांची आघाडी घेतली.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं आहे. पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांना चांगलाच धक्का दिला. अवघ्या 109 धावांवर संपूर्ण संघ तंबूत पाठवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 156 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडे 47 धावांची आघाडी आहे. दुसरीकडे रविंद्र जडेजा सोडला तर इतर कोणत्याही गोलंदाजाला अपेक्षित यश मिळालं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना भारताने जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. जर सामना गमावला तर मात्र चौथ्या कसोटीवर सर्व गणित अवलंबून असेल.
भारताचा डाव
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं आश्वासक सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र संघांच्या 27 धावा असताना रोहित शर्माच्या रुपाने पहिली विकेट गेली. त्याने 23 चेंडूत 12 धावांची खेळी केली. त्यानंतर एक एक करत सर्वच खेळाडू तंबूत परतले. शुभमन गिल (21), चेतेश्वर पुजारा (1), विराट कोहली (22), रविंद्र जडेजा (4), श्रेयस अय्यर (0), श्रीकर भारत (17), आर. अश्विन (3), उमेश यादव (17), मोहम्मद सिराज (0) अशा धावा करून बाद झाले. अक्षर पटेल नाबाद 12 धावांवर राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यु कुहनेमननं 9 षटकात 16 धावा देऊन 5 गडी बाद केले. नाथन लायननं 11 षटकात 35 धावा देत तीन गडी बाद केले.तर टोड मर्फीने एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाचा डाव
भारताने पहिल्या डावात केलेल्या 109 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया सुरुवातीलाच धक्का बसला. ट्रॅविस हेड अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मार्नसला नो बॉलवर जीवदान मिळालं. ख्वाजा आणि मार्नस जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मार्नस त्रिफळाचीत झाला. त्याने 31 धावा केल्या. त्यानंतर लगेचच उस्मान ख्वाजाच्या रुपाने जडेजाला मोठं यश मिळालं. 60 धावांवर असताना त्याला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. स्टिव्ह स्मिथ 26 धावांवर असताना रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर श्रीकर भारतनं त्याचा झेल घेतला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन.