माजी रणजीपटूचे ‘शतक’, रघुनाथ चांदोरकर वयाची शंभरी गाठणारे तिसरे भारतीय क्रिकेटर

| Updated on: Nov 21, 2020 | 7:15 PM

21 नोव्हेंबर 1920 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे रघुनाथ चांदोरकरांचा जन्म झाला.

माजी रणजीपटूचे शतक, रघुनाथ चांदोरकर वयाची शंभरी गाठणारे तिसरे भारतीय क्रिकेटर
Follow us on

अंबरनाथ : माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रघुनाथ चांदोरकर यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. रणजीमध्ये मुंबई आणि महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चांदोरकरांनी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही ‘शतक’ पूर्ण केलं. वयाचे शतक पूर्ण करणारे रघुनाथ चांदोरकर हे तिसरे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. (Former Indian First Class Cricketer Raghunath Chandorkar celebrates 100th Birthday)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानाची टोपी आणि कौतुकपत्र देऊन चांदोरकर यांचा गौरव केला. त्यांचे पणतू- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. क्रिकेटपटू दि. ब. देवधर (1892-1993) आणि वसंत रायजी (1920-2020) यांच्याप्रमाणेच त्यांनाही वयाची शंभरी पूर्ण करण्याचे भाग्य लाभले.

अष्टपैलू क्रिकेटपटू अशी ख्याती असलेले रघुनाथ चांदोरकर डोंबिवलीत असतात. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी केअर टेकरची व्यवस्था केली आहे. संचारबंदीच्या काळात लोकल सेवा बंद झाल्याने केअर टेकर घरी येणे बंद झाले. त्यामुळे त्यांना सध्या अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील त्यांची खोली सजवण्यात आली होती. त्यांच्या स्मृती आता काहीशी धूसर झाल्या असल्या तरी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करायला येणाऱ्या सर्वांचे ते हसतमुखाने स्वागत करत होते.

क्रिकेटपटूच्या आयुष्यात शतकी खेळीला विशेष महत्त्व असते. त्यात वयाची शंभर गाठणे हा मोठाच दुर्लभ योग असतो. 21 नोव्हेंबर 1920 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे रघुनाथ चांदोरकरांचा जन्म झाला. रघुनाथ चांदोरकर 1943-44 ते 1946-47 च्या काळात महाराष्ट्र संघाकडून पाच रणजी सामने खेळले. त्यांनी 1950-51 मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्त्व केले.

क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल आणि हॉकी खेळातही चांदोरकरांना रुची होती. महाराष्ट्राकडून एकाच वेळी क्रिकेट आणि फुटबॉल संघात त्यांची निवड झाली होती. मात्र पुढे त्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिले. मुंबईत पुरुषोत्तम शिल्ड, कांगा लीग आदी स्पर्धांमध्येही ते खेळले. पुरुषोत्तम शिल्ड स्पर्धेत माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांच्यासोबत त्यांनी विक्रमी भागिदारी केली होती. (Former Indian First Class Cricketer Raghunath Chandorkar celebrates 100th Birthday)

संबंधित बातम्या :

वसंत रायजी भारतातील सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू 

(Former Indian First Class Cricketer Raghunath Chandorkar celebrates 100th Birthday)