विराट आजच्या युगातील देव : ग्रॅमी स्वान
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण खेळीने क्रिकेटमधील अनेक नवे विश्वविक्रम केले. त्याची जागतिक पातळीवर प्रशंसाही झाली. आता तर इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटरने विराटला आजच्या युगातील देव म्हटले आहे.
लंडन: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण खेळीने क्रिकेटमधील अनेक नवे विश्वविक्रम केले. त्याची जागतिक पातळीवर प्रशंसाही झाली. आता तर इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटरने विराटला आजच्या युगातील देव म्हटले आहे. माजी ऑफ स्पिनर ग्रॅमी स्वानने विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील प्रामाणिकपणाचे कौतुक करत हे प्रशंसोद्गार काढले.
स्वान म्हणाला, “खेळाडूच्या बॅटला चेंडू लागतो, तेव्हा त्या खेळाडूला चेंडू बॅटला लागल्याचे समजते. अशावेळी आऊट नाही असे म्हणणाऱ्या खेळाडूंचा मला खूप राग येतो. पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या सामन्यात चेंडूचा विराट कोहलीच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता. तरीही विराट अंपायरचा निर्णय येण्याआधी क्रिजवरुन बाहेर गेला. यातून विराटची खिलाडूवृत्ती दिसते. म्हणूनच विराट माझ्यासाठी आधुनिक काळातील देव आहे.”
Virat Kohli is my favourite person on the planet at the moment!
Subscribe ➡ https://t.co/W82owsPcgF #SwannysCricketShow @JOE_co_uk pic.twitter.com/bVOaall62l
— Graeme Swann (@Swannyg66) June 23, 2019
काय आहे प्रकरण?
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये 16 जून रोजी सामना झाला. त्या सामन्यात विराट कोहली 77 धावांवर खेळत होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर 47 वे षटक टाकत होता. या षटकाचा चौथा चेंडू शॉर्टपिच (बाउंसर) होऊन विराट कोहलीच्या बॅटजवळून गेला. हा चेंडू थेट यष्टीरक्षक सरफराज अहमदच्या हातात गेला. त्यावेळी मोहम्मद आमिर आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी आऊट असल्याचे अपील केले. यावेळी कोहली अंपायरने काही निर्णय देण्याच्या आधीच क्रिजवरुन पॅव्हेलियनच्या दिशेने गेला.
यानंतर स्निकोमीटरवरुन संबंधित चेंडू विराटच्या बॅटला लागलाच नसल्याचे स्पष्ट झाले. ड्रेसिंग रुममध्ये विराट आणि टीम इंडियाचे खेळाडू देखील यावर चर्चा करताना पाहायला मिळाले. विराट कोहलीने देखील आपल्या या निर्णयावर पश्चाताप व्यक्त केला. मात्र, कोहलीचा हा स्वतःहून घेतलेला निर्णय अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला.