बर्थ डे स्पेशल: द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक कधी होणार?
मुंबई: एकेकाळचा टीम इंडियाचा भक्कम आधारस्तंभ, भारतीय संघाची ‘वॉल’ म्हणून ओळख असलेल्या राहुल द्रविडचा आज 46 वा वाढदिवस. क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे इमले उभारुन, प्रसिद्धीपासून दूर राहिलेला क्रिकेटचा सच्चा पुजारी म्हणजे राहुल द्रविड. टीम इंडियाला नेहमीच संकटातून सावरणाऱ्या राहुल द्रविडसाठी मागील वर्ष कमालीचं ठरलं. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. […]
मुंबई: एकेकाळचा टीम इंडियाचा भक्कम आधारस्तंभ, भारतीय संघाची ‘वॉल’ म्हणून ओळख असलेल्या राहुल द्रविडचा आज 46 वा वाढदिवस. क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे इमले उभारुन, प्रसिद्धीपासून दूर राहिलेला क्रिकेटचा सच्चा पुजारी म्हणजे राहुल द्रविड. टीम इंडियाला नेहमीच संकटातून सावरणाऱ्या राहुल द्रविडसाठी मागील वर्ष कमालीचं ठरलं. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारतीय संघाला चांगल्या प्रशिक्षकाची गरज असताना, राहुल द्रविडने मात्र युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास पसंत केलं. त्याचाच फळ म्हणजे टीम इंडियाला मिळालेली युवा फलंदाजांची खाण. एकीकडे राहुल द्रविड भारतीय संघाला उत्तम युवा खेळाडू पुरवत आहे, तर दुसरीकडे विराट कोहलीची टीम इंडिया नवनवे विक्रम रचत आहे. त्यामुळे राहुल द्रविड टीम इंडियाची प्रशिक्षकपदाची धुरा कधी सांभाळणार याची उत्सुकता आहे.
राहुल द्रविडची तेजस्वी कारकीर्द
द वॉल राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. कोणत्याही खेळाडूसाठी कारकिर्दीतील पहिला सामना महत्त्वाचा असतो. क्रिकेटची पंढरी अर्थात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर 1996 मध्ये भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना होता. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार होता. संजय मांजरेकरला दुखापत झाल्यामुळे या कसोटीत राहुल द्रविडला संधी मिळाली. 20 जून 1996 रोजी राहुल द्रविडला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.
पहिल्याच सामन्यात द्रविडने ‘वॉल’ची प्रचिती दिली आणि त्याने टिच्चून 95 धावा केल्या. टीम इंडियाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज मिळाल्याचे ते संकेत होते. त्या सामन्यात द्रविडने तब्बल 267 चेंडू खेळून काढले होते. याच सामन्यात सौरव गांगुलीने 131 धावा कुटल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता.
विनोद कांबळेच्या जागी द्रविडची निवड
राहुल द्रविडने 3 एप्रिल 1996 रोजी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सिंगापूर इथं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विनोद कांबळीच्या जागी राहुल द्रविडची भारतीय संघात निवड झाली होती. या सामन्यात राहुल द्रविडला मोठी खेळी करता आली नव्हती. अवघ्या 3 धावांवर त्याला मुरलीधरनने बाद केलं होतं. भारताने हा सामना 12 धावांनी जिंकला होता.
एकमेव टी 20 सामन्यात 3 षटकात
राहुल द्रविडने 15 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ एकमेव टी ट्वेण्टी सामना खेळला. टी 20 मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच त्याने क्रिकेटला अलविदा केला होता. अनेकांना टी 20 ची भुरळ असताना, राहुल द्रविड मात्र त्यापासून लांब राहिला. द्रविडने एकमेव टी 20 सामन्यात 21 चेंडूंवर 31 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 षटकार ठोकले होते.
राहुल द्रविडचे खास रेकॉर्ड
राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना केला. 286 कसोटींमध्ये त्याने 31 हजार 258 चेंडू खेळले. यामध्ये त्याने 13 हजार 288 धावा केल्या.
कसोटीमध्ये सर्वाधिक 210 झेल पकडण्याचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे. विकेटकीपरशिवाय कोणत्याही खेळाडूने झेललेले सर्वाधिक कॅच आहेत.
परदेशी खेळपट्ट्यांवरील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून राहुल द्रविडचा विक्रम आहे. 20 जून 1996 रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानातून त्याने कसोटी पदार्पणात 95 धावा केल्या.
सलग चार कसोटींमध्ये सलग चार शतकं ठोकण्याचा विक्रम द्रविडच्या नावे आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने 115,148 आणि 201 धावा केल्या होत्या. मग वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक झळकावून सलग चार कसोटीत सलग चार शतकं झळकावण्याचा पराक्रम केला.
राहुल द्रविडचं तांत्रिक कौशल्य
राहुल द्रविडच्या बचावात्मक फलंदाजीमुळे भल्या भल्या गोलंदाजांनी त्याच्यासमोर अक्षरश: हात टेकले. द्रविडची विकेट घेणं म्हणजे गोलंदाजांना जग जिंकल्याचा आनंद होता.
द्रविड केवळ कसोटी फलंदाज नव्हता, तर वन डेचं मैदानही त्याने गाजवलं. 1999 च्या वर्ल्डकपमध्ये द्रविडने सर्वाधिक 461 धावा केल्या होत्या.
वर्ल्डकप सामन्यांमध्ये द्रविड जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. द्रविडची सरासरी 61.42 इतकी होती.
ज्यावेळी भारतीय संघाला चांगला विकेटकीपर मिळत नव्हता, त्यावेळी द्रविडने स्वत: ग्लोव्ज घालून, संपूर्ण वर्ल्डकपमध्ये विकेटकीपिंग केली. उत्तम विकेटकीपर म्हणून त्याने लौकीक मिळवला.
द्रविडने विकेटकीपर म्हणून 73 वन डे सामन्यात 2300 धावा केल्या, ज्या धोनीनंतर सर्वाधिक धावा आहेत.
कसोटीचा शिक्का पुसून वन डे सामने गाजवले
राहुल द्रविडवर कसोटीपटूचा शिक्का बसला होता. मात्र आपण सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील वॉल आहोत हे त्याने दाखवून दिलं. वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो नववा खेळाडू ठरला. 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा द्रविड (10889) हा तिसरा खेळाडू ठरला.
नोव्हेंबर 2003 मध्ये द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद वन डे मध्ये 22 चेंडूत 50 धावा ठोकल्या होत्या. अजित आगरकरनंतर हे दुसरं वेगवान अर्धशतक होतं.
ऑगस्ट 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर राहुल द्रविडने वन डे आणि टी ट्वेण्टीतून निवृत्ती जाहीर केली. तर 9 मार्च 2012 मध्ये द्रविडने कसोटीला अलविदा केला
राहुल द्रविडला भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.