WTC 2023: “मी त्या संघात…”, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत हार्दिक पांड्यानं स्पष्टच सांगितलं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार आहे. त्यामुळे आतापासून संघ कसा असेल याबाबतची चाचपणी सुरु आहे. त्यात अष्टपैलू हार्दिक पांड्या असेल अशी चर्चा रंगली होती.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारतानं धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी हार्दिक पांड्याशी विचारणा सुरु असल्याच्या वावड्या उठल्या होता. आता त्यावर हार्दिक पांड्याने मौन सोडलं आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या बऱ्याच कालावधीपासून भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्या वनडे आणि टी 20 संघात खेळत आहे. मात्र अजूनही कसोटी संघात खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. आता हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार नाही. कारण त्या संघात मी अजून माझी जागा निर्माण केली नाही. नैतिकदृष्ट्या तसं करणं चुकीचं ठरेल. मी त्या संघात स्थान मिळवण्यासाठई 10 टक्के देखील दिले नाहीत. मी एक टक्का सुद्धा टेस्ट संघाचा भाग नाही. मी कसोटी संघात खेळणं आणि कोणाची जागा घेणं नैतिकदृष्ट्या बरोबर नाही.”, असं हार्दिक पांड्याने सांगितलं.
“कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत करेन आणि आपलं स्थान निर्माण करेन. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणि भविष्यात कसोटी मालिकेत नसेल. जिथपर्यंत मला वाटत नाही की मी माझी जागा निर्माण केली आहे तिथपर्यंत.”, असंही त्याने पुढे सांगितलं. हार्दिक पांड्याला यापूर्वीही कसोटी संघाबाबत विचारलं असताना त्याने मला ब्लू कपड्यामध्येच राहू द्या, असं उत्तर दिलं होतं.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराह कमबॅक करेल अशी तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे हा पर्याय देखील उरणार नाही. त्यामुळे उमेश यादवचं संघातील स्थान निश्चित आहे, असंच म्हणावं लागेल. त्यात बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पांड्याशी कसोटीत खेळण्याबाबत चर्चा सुरु केली आहे. त्यात वेगवान गोलंदाजीचं वर्चस्व इंग्लंडमध्ये असल्या कारणाने हर्षल पटेल आणि दीपक चाहर याचा विचार केला जाऊ शकतो. दोघंही गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करतात. बीसीसीआय यावेळी खेळाडू निवडताना काळजी घेत आहे. त्यासाठी आतापासूनच चाचपणी सुरु आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अशी असू शकते टीम इंडिया
संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन, दीपक चाहर, सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात असणार आहे. सामन्यात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास आयसीसीने एक दिवस राखून ठेवला आहे. म्हणजेच 12 जून हा दिवस राखीव असेल.