नासिर हुसैनच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरमनप्रीत कौरनं दिलं सडेतोड उत्तर, “सामना खेळताना…”
ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला. या सामन्यात पराभवाचं मुख्य कारण कर्णधार हरमनप्रीत कौरचं रनआऊट होणं सांगितलं जात आहे.
मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. अतितटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला. या सामन्यात पराभवाचं मुख्य कारण कर्णधार हरमनप्रीत कौरचं रनआऊट होणं सांगितलं जात आहे. हरमनप्रीतनं 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली.खुद्द हरमनप्रीत कौरनं रनआउट होणं दुर्दैवी असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नासिर हुसैन याच्या वक्तव्यानंतर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. नासिर हुसैननं पराभवासाठी हरमनप्रीत कौर जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.अशा प्रकारे रनआउट होणं म्हणजे एखाद्या शाळकरी मुलीच्या चुकीसारखं आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने हरमनप्रीत कौरला प्रश्न विचारताना सांगितलं की, लाईव्ह समालोचनावेळी नासिर हुसैननं रनआउट होणं एक शाळकरी मुलीची चूक किंवा क्लब क्रिकेट चुकीसारख आहे? अशा प्रकारच्या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे? यावर हरमनप्रीत कौरन तिच्याच अंदाजात उत्तर दिलं.
“ते असं बोलले का? ठिक आहे. हा त्यांची विचार करण्याची पद्धत आहे. मला तसं वाटत नाही. पण कधी कधी नकळत घडतं. मी असं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहिलं आहे. रन्स घेताना बॅट जमिनीवर अडकते. पण मला असं वाटते त्या वेळेस मी कमनशिबी होती. पण या व्यतिरिक्त आम्ही फिल्डिंग, गोलंदाजीतही कमी पडलो. काही वेळा आम्ही फलंदाजीही चांगली केली नाही. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. यामुळेच तुम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो. पण याचा अर्थ ती एका शाळकरी मुलीसारखी चूक होतं असं नाही. आम्ही आता परिपक्व झालो आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहोत.”, असं हरमनप्रीत कौरनं पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारताचा डाव
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.