DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादला पराभूत करण्यासाठी कशी आखली होती रणनिती? अक्षर पटेलने सांगितलं गणित
आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वरचष्मा दिसला. पहिल्या विकेटपासून दिल्लीने हैदराबादवर पकड कायम ठेवली आणि मोठी धावसंख्या करू दिली नाही. विजयासाठी मिळालेलं आव्हान 16 षटकात पूर्ण केलं.

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. लखनौ सुपर जायंट्सनंतर सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आहे. सनरायझर्स हैदराबादने 18.4 षटकात सर्व गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 16 षटकात पूर्ण केलं. दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट आणि 24 चेंडू राखून विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने सांगितलं की, ‘मी आधी सांगितले आहे की मी संघाचे नेतृत्व याच पद्धतीने करणार आहे. तुम्हाला तुमचा खेळ चांगला खेळावा लागेल. तुम्ही कोणताही सामना सहज घेऊ शकत नाही, 10 चांगले संघ खेळत आहेत. आपल्याला आपल्या योजना आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आज आपण असे करण्यात यशस्वी झालो.’
सनरायझर्स हैदराबादला पराभूत करण्यासाठी स्टार्कच्या गोलंदाजीची रणनिती कशी आखली होती? तेव्हा अक्षर पटेल म्हणाला की, ‘स्टार्कला सुरुवातीला दोन षटके आणि शेवटी दोन षटके देण्याची योजना होती, पण तो चांगल्या लयीत होता. म्हणून, मी त्याला तिसरे षटक दिले आणि तो एक महत्त्वाची विकेट घेऊ शकला. आमच्या संघात अनुभवी खेळाडू आहेत, ते मला सूचना देतात. कधीकधी मी त्यांचे अनुसरण करतो. या खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद घेत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून कोटलामध्ये खेळत आहोत, आमच्याकडे अशाच योजना असतील. तिथे गेल्यानंतर परिस्थितीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.’
दोन्ही संघाचे खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.