“मला जास्त बोलायला आवडत नाही, कारण..”, संजू सॅमसन अखेर बोलून मोकळा झाला
संजू सॅमसनचा टी20 क्रिकेटमधील बॅटिंग ग्राफ पाहून पुढे काय होईल कोणीच सांगू शकत नाही. एखाद्या सामन्यात मोठी खेळी, तर दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडता येत नाही. त्यामुळे संजूच्या खेळीबाबत अनिश्चितता असते.पण मागच्या काही सामन्यात संजूने खरंच चांगली कामगिरी केली आहे.
संजू सॅमसनने दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कमाल केली. पहिल्याच सामन्यात वादळी खेळी केल्यानंतर दोन सामन्यात फेल गेला. पण या मालिकेची सांगता शतकाने पुन्हा एकदा गोड केली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात तर संजू सॅमसनने कहर केला. या वर्षातील टी20 क्रिकेटमधील तिसरं शतक ठोकलं. एका वर्षात तीन शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच मालिकेतील दुसरं शतक ठोकलं आहे. त्यामुळे संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. संजू सॅमसनने या खेळीनंतर आपलं मन मोकळं केलं आणि म्हणाला, ‘माझ्या आयुष्यात खूप अपयश आलं. दोन शतकं आणि त्यानंतर दोन शून्य मिळाली. तरी मी स्वत:वर विश्वास ठेवला आणि कठोर परिश्रम करत राहिलो. आज ते पूर्ण झालं आहे. दोन तीन अपयशानंतर माझ्या डोक्यात बरंच काही सुरु होतं. अभिषेक आणि तिलकने या डावासाठी मदत केली.’ सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यात 73 धावांची भागीदारी झाली. तर संजू आणि तिलकने नाबाद 210 धावांची भागीदारी केली.
‘मला खूप काही बोलायला आवडत नाही. मागच्या वेळेस मी खूप काही बोललो आणि खूपदा शून्यावर बाद झालो. त्यामुळे मला सर्व गोष्टी साध्या ठेवायच्या आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मी तेच करत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याला अपेक्षित गोष्टी आम्ही करत आहोत. आम्ही त्या प्रत्यक्षात आणत आहोत याचा आनंद होत आहे.’, असं संजू सॅमसनने पुढे सांगितलं.
दरम्यान, संजू सॅमसनच्या वडिलांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. त्यांनी संजूच्या करिअरचं नुकसान झाल्याबद्दल रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला दोषी धरलं होतं. याबाबत संजू सॅमसनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. संजू सॅमसनकडे आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची धुरा आहे. राजस्थान रॉयल्सचं मेंटॉरशिप राहुल द्रविडकडे आहे. त्यामुळे राजस्थानची ताकद वाढली आहे. पण मेगा लिलावासाठी राजस्थान रॉयल्सकडे खूपच कमी पैसे आहेत. राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी शिल्लक आहे. तसेच 6 खेळाडू रिटेन केल्याने आरटीएम ऑप्शन नाही.