पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही : बेन स्टोक्स
या सुपर ओव्हरसाठी इंग्लंडकडून बेन स्टोक्सला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही, असं बेन स्टोक्सने म्हटलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने आयसीसीच्या एका नियमामुळे विजय मिळवला.
लंडन : इंग्लंडचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात बेन स्टोक्सने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. सुपर ओव्हरच्या थरारानंतर जास्त चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या सुपर ओव्हरसाठी इंग्लंडकडून बेन स्टोक्सला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही, असं बेन स्टोक्सने म्हटलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने आयसीसीच्या एका नियमामुळे विजय मिळवला. कारण, सामन्याप्रमाणेच सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती.
बेन स्टोक्सने 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 84 धावांची खेळी केली. शिवाय सुपर ओव्हरमध्येही त्यालाच फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. यावर स्टोक्स म्हणाला, मला शॉवर रुममध्ये जाऊन स्वतःला पाच मिनिटांचा वेळ द्यावा लागला होता. निश्चितपणे मी पुन्हा गोलंदाजी करु शकत नव्हतो. विजयानंतर डोळ्यात पाणी आलं. मी मार्क वूडचा चष्मा घातला होता. तो चष्मा मी तोडलाय, असं वाटल्याचं त्याने सांगितलं.
सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी जाण्याची इच्छा नव्हती. पण कर्णधार इयॉन मॉर्गनच्या सांगण्यावरुन खेळण्यासाठी गेलो, असं तो म्हणाला. आपण जोस बटलर आणि जेसन रॉय यांना पाठवायला हवं, असं मी सुचवलं होतं. पण मॉर्गनने डावा-उजवा हे कॉम्बिनेशन जुळवण्यासाठी मला पाठवलं, असं तो म्हणाला.
बेन स्टोक्सची फलंदाजी इंग्लंडसाठी विश्वविजेता बनण्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण, न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने नाबाद 84 धावांची खेळी तर केलीच, शिवाय या खेळीदरम्यान त्याने सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन जाण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडच्या दुर्दैवाने स्टम्पवर फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटवर लागला आणि तो थेट सीमारेषेवर गेला. यामुळे इंग्लंडला 6 धावा मिळाल्या आणि सुपर ओव्हरपर्यंत जाण्यात यश मिळवलं. अन्यथा या शेवटच्या षटकातच न्यूझीलंडचा विजय निश्चित मानला जात होता.
बेन स्टोक्सच्या बाबतीत रंजक गोष्ट म्हणजे तो ज्या देशाच्या विरोधात खेळला, तो त्याचा स्वतःचा देश होता. बेन स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 रोजी न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये आला आणि त्याने तिथेच क्रिकेटची सुरुवात केली. हळूहळू बेन स्टोक्स गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही उदयास आला, शिवाय इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातही संधी मिळवली. त्याने आतापर्यंत 52 कसोटी आणि 95 वन डे सामने खेळले आहेत, तर 23 टी-20 सामन्यांमध्येही त्याने इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलंय. बेन स्टोक्सचे आई आणि वडील आजही न्यूझीलंडमध्येच राहतात. तर बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये स्थायिक झालाय.