Video : पाकिस्तानच्या वुमन्स संघाला विकेटकीपरची ‘ती’ चूक भोवली, पंचांनी दिल्या पाच धावा
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विकेटकीपरच्या चुकीची चर्चा रंगली आहे. ब गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगला होता. या सामन्यात विकेटकीपर सिद्रा नवाज एक चूक केली आणि पाच धावांचा फटका बसला.
मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनं धडक मारली आहे. असं असताना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विकेटकीपरच्या चुकीची चर्चा रंगली आहे. ब गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगला होता. तसं पाहिलं तर हा औपचारिक सामना होता. कारण इंग्लंडची उपांत्य फेरीत वर्णी लागली होती. तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकत पाच गडी गमवून 213 धावा केल्या. तर पाकिस्तानचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 99 धावाच करू शकला. इंग्लंडनं पाकिस्तानचा 114 धावांनी पराभव केला. पण या सामन्यातील पाच धावांची चर्चा रंगली आहे. कारण विकेटकीपर सिद्रा नवाजच्या चुकीमुळे संघाला 5 धावांचा भुर्दंड सोसावा लागला. झालं असं की, सिद्रानं 15 षटकात क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू एक ग्लोव्हज काढून पकडला. त्यानंतर पंचांनी दुसऱ्या पंचांसोबत चर्चा केली आणि पाच धावांची पेनल्टी ठोठावली.
एमसीसी नियम 28.3.1 नुसार, “वापरात नसलेला हेल्मेट मैदानात ठेवण्याची परवानगी नाही. फक्त विकेटकीपरच्या मागे ठेवण्यास परवानगी दिली जाते. पण त्या हेल्मेटला चेंडू आदळला तर पाच धावा दिल्या जातात.”
View this post on Instagram
इंग्लंडचा डाव
सोफिया डंकले आणि एलिस कॅपसे या दोघी झटपट बाद झाल्याने संघावर दबाव आला होता. पण डॅनी व्यॅट आणि नॅट क्विवर ब्रंट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. डॅनी व्यॅटनं 33 चेंडूत 59 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर नॅट क्विवर ब्रंट हीने 40 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. डॅनी बाद झाल्यानंतर हिथर नाईटही झटपट बाद होत तंबूत परतली. त्यानंतर एमी जोन्सनं जोरदार फटकेबाजी केली. तिने 31 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार फटका मारताना बाद झाली.
पाकिस्तानचा डाव
इंग्लंडनं विजसाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करता करताना शुन्यावरच पहिली विकेट पडली. सदाफ शाम्स भोपळाही फोडू शकली नाही. त्यानंतर मुनिबा अली 3 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर विकेट्सची रांग सुरु झाली. ओमैमा सोहेल (9), सिद्रा अमीन (12) आणि निदा दार (11), आलिया रियाज (5), सिद्रा नवाज (3), तुबा हस्सन (28) आणि नाश्रा सांधु (1) या धावा करून बाद झाले.