भारत चांगला संघ, पण आम्ही त्यांना हरवणार : शाकिब अल हसन
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी बांगलादेशला अजूनही संधी आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने भारताला हरवण्यचा विश्वास व्यक्त केलाय. यासाठी आम्ही आमचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करु, असंही तो म्हणाला.
लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात दिग्गज संघांवर मात करणाऱ्या बांगलादेशचा विश्वास दुप्पट झालाय. कारण, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी बांगलादेशला अजूनही संधी आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने भारताला हरवण्यचा विश्वास व्यक्त केलाय. यासाठी आम्ही आमचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करु, असंही तो म्हणाला.
2007 च्या विश्वचषकात बांगलादेशनेच साखळी सामन्यात भारतावर मात करत बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर भारतीय संघावर मोठी टीका झाली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. “भारत सध्या टॉपचा संघ असून विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. त्यांनी हरवणं शक्य नाही. पण आम्ही त्यांना हरवण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करु, पण त्यांच्यावर मात करु,” असा विश्वास शाकिबने व्यक्त केला.
आम्हाला अनुभवाची मदत मिळेल. भारताला हरवण्यासाठी चांगल्या कामगिरीची गरज आहे. भारताकडे वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत, जे त्यांच्या स्वतःच्या बळावर सामना जिंकू शकतात. पण माझं मत आहे की आम्ही त्यांना हरवू शकतो, असा दावा शाकिबने केला.
बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनीही शाकिबच्या विश्वासाला बळ दिलं. भारतीय संघ फिरकीपटूंसाठी प्रसिद्ध आहे हे आम्हाला समजलंय, पण आम्हीही फिरकीपटूंविरोधात चांगलं खेळतो, असं सुनील जोशी म्हणाले. सुनील जोशी यांनी भारतीय संघाकडून 15 कसोटी आणि 69 वन डे खेळले आहेत. टी-20 आणि वन डेमध्ये आम्ही आमची कामगिरी सिद्ध केली आहे, वेस्ट इंडिजला हरवलंय आणि गेल्या काही वर्षात भारतालाही अनेकदा हरवलंय, असं जोशी म्हणाले.
बांगलादेशने विश्वचषकात आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानवर मात केली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामना 2 जुलै रोजी रंगणार आहे. बांगलादेशने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये तीन विजय मिळवले आहे, ज्याच्या बदल्यात बांगलादेश गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.
शाकिब अल हसन तुफान फॉर्मात
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरलेला शाकिब सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात त्याने 95.20 ची सरासरी आणि 99.17 च्या स्ट्राईक रेटने 476 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सध्या अव्वल आहे. तर बांगलादेशकडून सर्वाधिक विकेटही त्याच्याच नावावर आहेत.