… तर चिडलेला अंबाती रायुडू आईसलँडकडून खेळणार?
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Ambati Rayudu retires मुंबई : विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीबाबत त्याने बीसीसीआयला लेखी कळवलं आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईकडून खेळलेल्या रायुडूने जबरदस्त कामगिरी केली होतीच, शिवाया भारताकडून खेळतानाही रायुडूने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. मात्र तरीही वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. याबाबतची नाराजी त्याने बोलून दाखवली होती.
भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत होऊनही, राखीव अंबाती रायुडूची निवड भारतीय संघात झाली नाही. त्यामुळे रायुडूने थेट निवृत्ती घेतली. धवन आणि विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांची निवड झाली आहे. यानंतर रायुडूने क्रिकेटला गुडबाय केला.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने नाराज रायुडूला आईसलँड क्रिकेट बोर्डाने त्याला ऑफर दिली. आईसलँडने रायुडूला नागरिकतेची ऑफर दिली आहे. आईसलँड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रायुडूला नागरिकतेच्या फॉर्मबाबत डिटेल माहिती दिली आहे.
Agarwal has three professional wickets at 72.33 so at least @RayuduAmbati can put away his 3D glasses now. He will only need normal glasses to read the document we have prepared for him. Come join us Ambati. We love the Rayudu things. #BANvIND #INDvBAN #CWC19 pic.twitter.com/L6XAefKWHw
— Iceland Cricket (@icelandcricket) July 1, 2019
आईसलँड क्रिकेटने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “अग्रवालने (मयांक अग्रवाल) 72.33 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अंबाती रायुडू आता आपला 3D चष्मा उतरवू शकतो. आम्ही त्याच्यासाठी जे दस्तऐवज तयार केले आहेत, ते त्याने वाचावे, त्यासाठी केवळ साध्या चष्म्याची गरज आहे. रायुडू आमच्यासोबत ये. वी लव्ह द रायुडू थिंग्ज”
आईसलँडची ऑफर रायुडूने स्वीकारलेली नाही. आईसलँडने गांभीर्याने त्याला ही ऑफर दिली की नाही हे गुलदस्त्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आईसलँडचं नाव नाही.
ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या 3D चष्म्याचा अर्थ काय?
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात, निवड समितीने रायुडूचा 15 जणांच्या संघात समावेश केला नव्हता. त्याच्या जागी युवा ऑलराऊंडर विजय शंकरला संधी देण्यात आली. शंकरची निवड करताना निवड समितीने तो 3D प्लेयर आहे, म्हणजेच फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग करु शकतो, असं म्हटलं होतं. त्याबाबत रायुडूने टोमणा लगावत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी नुकतंच 3D चष्म्याची ऑर्डर केली आहे, असं ट्विट रायुडूने केलं होतं.
वर्ल्डकपमधील विजयची कामगिरी
दरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेला विजय शंकर आता वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो विश्वचषकातून बाहेर पडला. विजयला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आलं होतं. मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. विजयने केवळ 58 धावा केल्या.
दरम्यान विजयला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी मयांक अग्रवालची निवड करण्यात आली. मात्र संघनिवडीवेळी राखीव असलेल्या अंबाती रायुडूला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे रायुडूने थेट निवृत्तीचं पाऊल उचललं.
संबंधित बातमी
अंबाती रायुडूची निवड न झाल्याने ICC ही थक्क, स्वत: रायुडूची आकडेवारी BCCI ला दिली!
अंबाती रायुडूची धक्कादायक निवृत्ती, नाराज रायुडूचा क्रिकेटला अलविदा!
….म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!
ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर