IND vs AUS : तिसरा कसोटी सामना गमावला तर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कसं असेल? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं आहे. टीम इंडिया अवघ्या 109 धावांवर तंबूत परतली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी पणं संपूर्ण 109 धावांवर तंबूत परतला. तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मजबूत स्थिती घेतली. पहिल्या दिवशीचा खेळ पाहता पाच दिवसांचा कसोटी सामना तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच संपेल असं चित्र आहे. सध्याची स्थिती पाहता तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड वाटत आहे. अशात भारताने तिसरा कसोटी सामना गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कसं असेल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत एकूण चार सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवून भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील दुसरं स्थान अबाधित आहे.
कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला ही मालिका 3-0, 3-1 किंवा 4-0 नं जिंकणं आवश्यक आहे. अशी स्थिती असल्यास अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत लढत पाहायला मिळेल. पण सध्या सुरु असलेला तिसरा सामना गमवला तर मात्र चौथ्या काहीही करून जिंकावाच लागेल.
भारताने ही मालिका 2-1 जिंकली किंवा 2-2 ड्रॉ झाली तर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सीरिजवर अवलंबून राहावं लागेल. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयापासून रोखलं तर भारताला संधी मिळेल.
ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-0 ने गमावली तर त्यांच्या गुणांमध्ये घसरण होईल आणि त्यामुळे श्रीलंकेला अंतिम फेरीसाठी संधी मिळेल. म्हणजेच भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम फेरीचा सामना होईल. पण ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-0 किंवा 3-1 ने गमावली तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीचा सामना होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उरलेले सामने
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
- दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज (पहिला कसोटी सामना) – सेंचुरियन, दक्षिण अफ्रीका, 28 फेब्रुवारी-4 मार्च
- दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज (दुसरा कसोटी सामना) – जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका, 8-12 मार्च
- न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (पहिला कसोटी सामना) – क्राइस्टचर्च, न्यूजीलँड, 9-13 मार्च
- न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (दुसरा कसोटी सामना) – वेलिंगटन, न्यूजीलँड, 17-21 मार्च
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख
फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.