Video : पुजाराची 59 धावांची खेळी तरी रोहित शर्मा वैतागला, कॅमेऱ्याने सर्वकाही टिपलं आणि पुढच्या षटकात…
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने चिवट खेळी केली. 59 धावांची खेळी करत भारतावरील तात्पुरती का होईना नामुष्की टाळली. पण त्याच्या खेळीने कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला होता.
मुंबई : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. कारण ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 75 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यात तीन दिवसांचा खेळ उरला असल्याने गोलंदाजांना 75 धावा रोखणं कठीण आहे. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. असं असलं तरी ऑस्ट्रेलिया सध्यातरी मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पाहून कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. खासकरुन मैदानात तग धरून असलेल्या चेतेश्वर पुजाराची फलंदाजी बघून त्याने संताप व्यक्त केला. त्याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात चित्रित झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावता चेतेश्वर पुजारानेच चांगली खेळी केली. एकीकडे फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून जात होते. दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने डाव सावरला होता. त्याने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. मात्र नाथन लायनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यामुळे भारताच्या 100 धावा करणाच्या आशाही संपुष्टात आल्या.
चेतेश्वर पुजारा खेळत असताना रोहित मात्र वैतागलेला दिसाला. इशान किशान सोबत हातवारे करून राग व्यक्त करत होता. यावेळी समालोचक रवि शास्त्री यांनी अजित आगरकरला त्या एक्स्प्रेशनचं भाषांतर करण्यास सांगितलं. रवि शास्त्री यांनी सांगितलं की, “तो काय बोलत आहे ते सांग अजित आगरकर.” तेव्हा अजित आगरकरने सांगितलं की, “ही एक सांकेतिक भाषा आहे आणि तो ती किशनला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सांग चेंडू फुल ऑन पायावर आला तर आक्रमकपणे खेळ. पण मला वाटत नाही पुजाराच्या खेळात काही बदल होईल.”
— Guess Karo (@KuchNahiUkhada) March 2, 2023
पुढच्या षटकातच रोहित शर्मा आणि टीमला पुजाराचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. त्याने नाथन लायनला षटकार ठोकला. “पुजाराने लांब षटकार ठोकला आणि तो चेंडू प्रेक्षकांमध्ये पोहोचलाय. बघ तो आता काय प्रयत्न करत आहे. रोहित शर्माचा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचला आहे. तू सांगितलेलं बरोबर होतं.”, असं रवि शास्त्री यांनी समालोचन करताना पुढे सांगितलं.