IND vs AUS : रोहित शर्मा सिडनी कसोटी सामना खेळणार होता, पण असं काय झालं की…
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा पाचव्या कसोटी खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. पण शेवटच्या सामन्यात रोहित शर्माला बाहेर बसवण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहे. कारण एक दिवस आधी तो सामना खेळणार असल्याची माहिती समोर आली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली आहे. 3 जानेवारीला सुरु होणाऱ्या या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पण रोहित शर्माला का आणि कसं बसवण्याचा निर्णय घेतला गेला हा प्रश्न आहे. कारण पाचवा कसोटी सामना खेळण्याची त्याने पूर्ण तयारी कोली होती. पाचव्या कसोटी सामन्यात खेळायचं म्हणून ट्रेनिंग सेशनमध्येही भाग घेतला होता. पण मैदानात पोहोचल्यानंतर त्याने 35 मिनिटं बॅटिंग केली नाही. पीटीआय रिपोर्टनुसार, यानंतर किट न घेताच शांतपणे नेटजवळ गेला. टीम इंडियाचा हेड कोच गंभीर नेटपासून दूर उभा होता आणि जसप्रीत बुमराहसोबत चर्चा करत होता.
दुसरीकडे, व्हिडीओ एनालिस्ट हरि प्रसादसोबत रोहित शर्मा चर्चा करू लागला. पण या दरम्यान रोहित आणि गंभीर यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. भारताच्या टॉप ऑर्डरने आपला बॅटिंग सराव केला. त्यानंतर रोहित शर्माने नेटमध्ये एन्ट्री मारली. मेलबर्नमध्ये त्याने असंच काहीसं केलं होतं. पण त्यानंतर सुरुवातीला उतरला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 30 मिनिटं बॅटिंग सराव केला. रिपोर्टनुसार, फिल्डिंग कोच टी दिलीपच्या थ्रोडाऊन लाईनचा सामना करताना वारंवार अडखळत होता. तसेच एका चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. बॅटिंग करताना तो चेंडूवर उशिराने रिएक्ट करत होता.
दुसरीकडे, रोहित शर्माच्या बाजूच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करणारा नितीश रेड्डी चांगल्या लयीत दिसला. बॅटिंग सेशननंतर एक बैठक बोलावली गेली. त्यात निर्णय घेतला गेला की, भारतीय कर्णधाराला सिडनी कसोटीत आराम दिला जाईल. रोहित शर्माचा ट्रेनिंग संपताच बुमराह आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर नेटमधून निघाले. तर गंभीर तिथेच थांबला होता. एका तासानंतर जवळपास सर्वच खेळाडू मेन गेटने टीमच्या बसकडे गेले. पण रोहित शर्मा तिथे आला नाही. तो दुसऱ्या गेटने स्टेडियम बाहेर आला आणि बसमध्ये बसला.