वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताविरुद्ध ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात चौथ्या विकेटसाठी 285 धावांची विक्रमी भागीदारी झाली होती. या भागीदारीमुळे या सामन्यावर कांगारू संघाची पकड मजबूत झाली आहे.
टॉस हरल्यानंतर कांगारू संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 76 धावांवर 3 विकेट गमावल्या, परंतु त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 285 धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
ट्रॅव्हिस हेड 174 चेंडूत 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 1 षटकार मारला. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला माघारी पाठवलंत्याचवेळी स्टीव्ह स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार मारले. शार्दुल ठाकूरने स्टीव्ह स्मिथला बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम वॉरेन बोर्डस्ले आणि चार्ल्स केलवे यांच्या नावावर होता. या दोन्ही खेळाडूंनी 1912 साली लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 242 धावांची भागीदारी केली होती. शारजाह क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांच्यात 184 धावांची भागीदारी झाली होती. या दोन्ही खेळाडूंनी 2002 मध्ये हा पराक्रम केला होता.
आता ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने 111 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. आता ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तटस्थ ठिकाणी सर्वाधिक धावा करणाऱ्या कांगारू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.