IND vs AUS | रोहित शर्मानं माजी क्रिकेटपटूंना सुनावलं,खेळपट्टीवर विचारलेल्या प्रश्नावर दिलं असं उत्तर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील खेळपट्ट्यांवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं की, आम्ही याच खेळपट्ट्यांवर खेळू.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तीन सामने संपले असून शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. मालिकेत आता 2-1 अशी स्थिती आहे. पहिले दोन कसोटी सामने भारताने जिंकल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं आहे. असं असताना तीन कसोटी सामन्यात चर्चा झाली ती खेळपट्ट्यांची. इतकंच काय मालिका सुरु होण्यापूर्वीच आजी माजी खेळाडू खेळपट्ट्यांवरून टीका करत होते. यावर आता कर्णधार रोहित शर्मानं आपलं मत मांडलं आहे. त्याचबरोबर खेळपट्ट्या बरोबर असल्याचं सांगितलं आहे. “भारतीय खेळपट्ट्यांबाबत बरीच चर्चा केली जाते. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या ही भारताची ताकद आहे आणि आम्ही त्या आधारावरच खेळू.”, असं रोहित शर्मानं सांगितलं.
भारताचा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि मार्क वॉने खेळपट्टीवर टीका केली होती. याबाबत रोहित शर्मा याला प्रश्न विचारताच त्याने आक्रमकपणे सुनावलं. “माजी क्रिकेटपटू अशा पद्धतीच्या खेळपट्ट्यांवर खेळलेले नाही. म्हणून त्यांच्याबाबत माहिती नाही. आम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळू इच्छितो. जेव्हा घरच्या मैदानात खेळता तेव्हा तुमच्या ताकदीने खेळता. लोक काय बोलतात याने मला काही फरक पडत नाही.”, असं रोहित शर्माने सांगितलं.
“प्रत्येक मालिकेपूर्वी आम्ही विचार करतो की आम्हाला कोणत्या खेळपट्टीवर खेळायचं आहे. या पद्धतीच्या खेळपट्टीवर खेळण्याचा निर्णय आमचा होता. मला नाही वाटत आम्ही फलंदाजांवर दबाव टाकत आहोत. जेव्हा आम्ही जिंकतो तेव्हा सर्व व्यवस्थित वाटतं. पण तेव्हा कोणी आम्हाला फलंदाजीबाबत विचारत नाही. या पद्धतीच्या गोष्टी आम्ही हरल्यानंतर पुढे येतात. आम्ही या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला आव्हान असेल आणि आम्ही तयार आहोत.”, असं रोहित शर्माने खेळपट्ट्यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं.
तिसरा कसोटी
तिसरा कसोटी सामना आस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं 76 धावांचं आव्हान तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह मालिकेत 2-1 स्थिती आहे. ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. तर भारताची मदार आता चौथ्या कसोटी सामन्यावर अवलंबून असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.