IND vs AUS | तिसऱ्या कसोटीत रविंद्र जडेजानं रचला इतिहास, नव्या विक्रमाची नोंद
रविंद्र जडेना आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. तिसऱ्या कसोटीत ट्रॅविस हेडला बाद करत कपिल देव आणि इम्रान खान यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार रविंद्र जडेजा चांगलाच फॉर्मात आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. तिसऱ्या कसोटी सामन्यातही रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली. या कामगिरीमुळे रविंद्र जडेजाच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात यापूर्वी एकदाच अशा विक्रमाची नोंद झाली आहे. इंदौर कसोटीत रविंद्र जडेजाने ट्रॅविस हेडला बाद केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला. यापूर्वी हा विक्रम माजी क्रिकेटपटू असलेल्या अष्टपैलू कपिल देव याच्या नावावर होता.
रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट आणि 5000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देवने कसोटी आणि वनडेत मिळून 9031 धावा आणि 687 विकेट घेतले आहेत. तर जडेजाच्या नावावर टेस्ट, वनडे आणि टी 20 मिळून 5527 धावा आणि 502 विकेट्स झाले आहेत. जडेजाने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत 263 गडी बाद केले आहेत. यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या जोएल गार्नर आणि ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पी यांना मागे टाकलं आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा रविंद्र जडेजाने एकूण 4 गडी बाद केले होते. यात ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथचा समावेश आहे. रविंद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत 37 वा खेळाडू आहे. तर भारताचा 7 वा खेळाडू आहे. यापूर्वी भारतासाठी अनिल कुंबले, हरभजन सिंग, कपिल देव, रविचंद्रन अश्विन, जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी हा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू
- अनिल कुंबले – 953 विकेट
- हरभजन सिंह – 707 विकेट
- कपिल देव – 687 विकेट
- रविचंद्रन अश्विन – 686 विकेट
- जहीर खान – 597 विकेट
- जवागल श्रीनाथ – 551 विकेट
- रविंद्र जडेजा- 502 विकेट
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.