IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात एक बदल निश्चित! कोणाला डावलणार? जाणून घ्या
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याची उत्सुकता लागून आहे. चौथा कसोटी सामना हा निर्णायक असल्याने दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील. असं असताना चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात एक बदल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर आली आहे. भारताचा अंतिम फेरीचा साधा सोपा मार्ग न्यूझीलंडने दिलेल्या क्लिन स्विपमुळे किचकट झाला. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चौथा आणि पाचवा कसोटी सामना जिंकणं आवश्यक आहे. चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मेलबर्न खेळपट्टीचा अंदाज घेऊन ऑस्ट्रेलियाने आधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे. असं असताना टीम इंडियात चौथ्या कसोटीसाठी एक बदल निश्चित दिसत आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह वगळता एकही गोलंदाज आपला प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा अतिरिक्त फिरकी अष्टपैलूला संधी देण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या कसोटीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून दिसू शकतात. तसेच जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज असतील.
तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू गोलंदाज असलेल्या नितीश कुमार रेड्डीला वगळण्याची शक्यता वाढली आहे. कारण यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, शुबमन गिलची जागाही संकटात आहे. कारण रोहित शर्मा चौथ्या कसोटी सामन्यात ओपन करण्याची शक्यता आहे. त्यात शुबमन गिल काही खास करू शकलेला नाही. त्यामुळे शुबमन गिलला वगळून नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळू शकते. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन पाहता शुबमन गिल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर टांगती तलवार आहे. आता रोहित शर्मा काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागून आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल/नितीश कुमार रेड्डी, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा,वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह,आकाश दीप,मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्सटस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लॉयन, स्कॉट बोलँड.