कॅप्टन कुलच्या ‘या’ रेकॉर्डवर विराट कोहलीचा डोळा, तिसऱ्या कसोटीत धोनीला पछाडणार?
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 2nd test) 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.
चेन्नई : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 2nd test) 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. दरम्यान, या विजयासह कर्णधार विराट कोहलीने महेंद्र सिंह धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. (IND vs ENG : Virat Kohli equal MS Dhoni record of Most wins as Indian captain in Tests in India)
चेन्नई कसोटीतील विजयासह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी मिळाली आहे. चेन्नईच्या किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय भूमीवर कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. परंतु आज चेन्नई कसोटीतील विजयामुळे विराट कोहलीने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत विजय मिळवला तर धोनीचा विक्रम मोडीत काढत विराट कोहली भारतात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार ठरणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भारतीय मैदानांवर 21 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. धोनीने भारतात 30 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 21 सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ भारतात 28 कसोटी सामने खेळला आहे. यापैकी 21 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे विराटने आता धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघ इंग्लंडविरोधात अजून दोन कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये विराटला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 24 फेब्रुवारीपासून भारतीय संघ अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.
चेन्नई कसोटीतील टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
अश्विन-अक्षरची फिरकी
या सामन्यात टीम इंडियाच्या फिरकी जोडीने महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात फिरकीने 7 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात सर्वच्या सर्व 10 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. दुसऱ्या डावात अक्षर पटेलने सर्वाधिक – विकेट्स घेतल्या. तर अश्विनने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. कुलदीप यादवने 1 विकेट मिळवली. तर पहिल्या डावात अश्विनने 5 आणि अक्षरने 2 विकेट्स मिळवल्या.
अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण
अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण ठरलं. पटेलने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. अक्षर पदार्पणात 5 विकेट्स घेणारा 9 वा भारतीय ठरला.
पंतची अफलातून किपींग
विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून धमाकेदार कामगिरी करतोय. अशीच कामगिरी त्याने या दुसऱ्या कसोटीत केली. पंतने या सामन्यात पहिल्या डावात नाबाद 58 धावा केल्या. दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. त्याने अवघ्या 8 धावा केल्या. पण त्याने स्टंपमागे शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात किपींग करताना दोन्ही डावात मिळून 2 भन्नाट कॅच आणि 2 स्टपिंग घेतल्या.
लोकल बॉय अश्विनची अष्टपैलू कामगिरी
अष्टपैलू आर अश्विनने आपल्या घरच्या मैदानावर ऑलराऊंड कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात बॅटिंग करताना केवळ टीम इंडियाचा डावच सावरला नाही तर वैयक्तिक शतकही लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या.
तसेच अश्विनने पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 29 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात अश्विनने 3 विकेट्स मिळवल्या.
टॉस फॅक्टर महत्वाचा
या दुसऱ्या सामन्यात टॉस फॅक्टर महत्वाचा ठरला. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय टीम इंडियाने योग्य ठरवत चांगली कामगिरी केली. यामुळे एकूणच भारतीय संघ टॉसचा बॉस ठरल्याने विजयामध्ये टॉसने महत्वाची भूमिका बजावली. याच मैदानात इंग्लंडने पहिल्या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सामनाही जिंकला होता. यामुळे चेन्नईच्या या एम ए चिदंबरम स्टेडियमवर टॉस फॅक्टर म्हत्वाचा आहे.
संबंधित बातम्या :
IND vs ENG | अश्विन ठरला ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज, धोनीचा रेकॉर्ड मोडीत
(IND vs ENG : Virat Kohli equal MS Dhoni record of Most wins as Indian captain in Tests in India)