लाहोर : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात अनेक रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत हे संघ शानदार फॉर्मात आहेत. पण या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारतीय संघच असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचं म्हणणं आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीला एक संघ निवडायचा होता. त्याने भारतीय संघ निवडला.
समोर प्रश्न विचारण्यासाठी पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर होता. विश्वचषक कोण जिंकेल, असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला. त्यावर आफ्रिदी म्हणाला, “मी आतापर्यंत जेवढे सामने पाहिले आहेत, त्यानुसार भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार वाटतो. पूर्वी त्यांची गोलंदाजी कमकुवत असायची.”
भारतीय संघाची फलंदाजी तर नेहमीच चांगली होती. पण सध्या त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार आली आहे. तुम्ही त्यांच्या गोलंदाजांकडे पाहा. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल युवा असूनही अत्यंत समजदारपणे गोलंदाजी करतात आणि ते कौतुकास पात्र आहेत. शिवाय वेगवान गोलंदाजीमध्येही भारतीय संघ आता चांगला आहे, असंही आफ्रिदी म्हणाला.
इंग्लंडमधील खेळपट्टीवर ज्या गोलंदाजीची गरज असते, त्याच पद्धतीची गोलंदाजी भारतीय संघाकडून केली जात आहे. मला वाटतं की भारतीय संघासोबत इंग्लंडचा संघही फायनलपर्यंत मजल मारु शकतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे, असा अंदाज आफ्रिदीने व्यक्त केला.
या विश्वचषकात अनेक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. श्रीलंकेने अत्यंत कमी धावसंख्येचं आव्हान दिलेलं असतानाही इंग्लंडला हरवलं, तर दुसरीकडे अफगाणिस्तानने भारतीय फलंदाजांना जेरीस आणत केवळ 224 धावांवर रोखलं. 10 संघांच्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.