चौथा कसोटी सामना गमवल्यास भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत असा जाणार, जाणून घ्या संपूर्ण गणित
तिसरा कसोटी सामना गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित किचकट झालं आहे. जर भारताने चौथा सामना गमावला तर काय होईल असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला. चला जाणून घेऊयात नेमकं काय ते
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिका सुरु असली तरी सध्या चर्चा रंगली आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची..वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा दोन वर्षांनी येते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद मिळावं यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील असतो. पण अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यासाठी मालिका विजय, ड्रॉ, पराभव या परिस्थितींचं मुल्यांकन केलं जातं. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पण तिसरा निर्णायक सामना गमवल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित जर तर वर आलं आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी श्रीलंका आणि भारत या दोन संघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे चौथा सामना जिंकणं भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मात्र चौथा कसोटी सामना गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कसं असेल जाणून घेऊयात
टीम इंडियाने चौथा सामना गमवल्यास गुणतालिकेत भारताचे गुण 56.94 टक्के इतके राहतील. मात्र असं असलं तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत असेल. न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका या मालिकेवर लक्ष लागून असेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड दोन सामन्यांची मालिका आहे. ही मालिका श्रीलंकेन 2-0 ने जिंकली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर जाईल. या परिस्थितीत श्रीलंकेचे 61.11 टक्के गुण होतील.
न्यूझीलँड या मालिकेतील एक सामना जरी ड्रॉ करण्यात यशस्वी झाला, तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीचा सामना रंगेल. कारण श्रीलंकेने ही मालिका 1-0 ने जिंकल्यास त्यांचे 55.55 टक्के गुण होतील.
भारताने चौथा कसोटी सामना जिंकला तर दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार आहे. भारताने आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळला असून 10 मध्ये विजय, 5 मध्ये पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. मागची टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धाही इंग्लंडच्या साउथँपटनच्या रोज बाउल मैदानात झाली होती. भारत विरुद्ध न्यूझीलँड या सामन्यात न्यूझीलँडने बाजी मारली होती.