अरे रे! भारताचं T20 वर्ल्डकप उपांत्य फेरीचं गणित फिस्कटलं, आता पाकिस्तान सुद्धा शर्यतीत
भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्याचं रस्ता इंग्लंड विरुद्धच्या पराभवामुळे अवघड झाला आहे. आता आयर्लंड विरुद्धचा सामना भारताला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल किंवा पाकिस्तानचा एका सामन्यात पराभव होणं गरजेचं आहे.
मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडनं भारताचा 11 धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं फलंदाजी करताना 7 गडी गमवून 151 धावा केल्या. हे आव्हान गाठणं भारताला जमलं नाही. भारतानं 20 षटकात 5 गडी गमवून 140 धावा केल्या. या पराभवामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित आणखी किचकट झालं आहे.तर इंग्लंडनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताला आता आयर्लंड विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. तसेच पाकिस्तानच्या गुणांकडे लक्ष ठेवावं लागेल.कारण पाकिस्तानचे अजूनही दोन सामने होणं बाकी आहेत. त्यामुळे आता जर तरची स्थिती निर्माण झाली आहे.
कसं असेल उपांत्य फेरीचं गणित
गुणतालिकेत इंग्लंडनं तीन पैकी तीन सामने जिंकत +1.776 सरासरीसह 6 गुण मिळवले आहेत. तर भारताने तीन पैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाल्याने +0.205 सरासरीसह 4 गुण मिळवले आहे.पाकिस्तानचा दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे +1.542 सरासरीसह 2 गुण मिळाले आहे. अजूनही पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक असल्याने आशा पल्लवीत आहेत. पाकिस्ताननं आयर्लंडचा 70 धावांनी पराभव केल्याने सरासरीत भारतापेक्षा पुढे आहे.दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचं उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
भारताचा डाव
इंग्लंडनं दिलेलं 152 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली. पण शफाली वर्माला तिसऱ्या सामन्यातही सूर गवसला नाही. तिने 11 चेंडूत 8 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर स्वस्तात बाद झाल्या. जेमिमाने 13 तर हरमनप्रीत कौरने 4 धावा केल्या. स्मृती मंधानाला रिचा घोषची चांगली साथ मिळाली. दोघांनी 43 धावांची भागीदारी केली. मात्र सारा ग्लेनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारत स्मृती 52 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर दीप्ती शर्माही कमाल करू शकली नाही. 7 धावांवर असताना धावचीत झाली. तर रिचा घोषची एकाकी झुंज अपयशी ठरली. तिने 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 47 धावा केल्या.
इंग्लंडचा संघ : सोफिया डंकले, डॅनी व्यॅट, एलिस कॅपसे, नॅट क्विवर ब्रंट, हिथर नाइट, एमी जोन्स, कॅथरिन क्विवर ब्रंट, सोफी एस्सेलस्टोन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल
भारतीय संघ : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स, हरमनप्रीत कौर, रिचा घोष,दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकडवाड, रेणुका सिंग