भारताचं टेन्शन वाढणार! ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुधारण्यासाठी हा माजी खेळाडू मारणार एन्ट्री
चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची पुरती दाणादाण उडाली आहे. पाच दिवसांचे दोन्ही सामने तिसऱ्या दिवशीच आटोपले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांची ही स्थिती पाहून त्यांच्या मदतीसाठी माजी खेळाडूने पुढाकार घेतला आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. ही मालिका भारत 3-0 ने जिंकला तरच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. अन्यथा श्रीलंकेच्या न्यूझीलँड दौऱ्याकडे डोळे लावून बसावं लागेल. त्यामुळे भारतीय जर तरच गणित न ठेवता, मालिका 3-0 ने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा काही एक चालत नाही. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने 40 पैकी 32 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाजांची हाराकिरी पाहून आता त्यांच्या मदतीला दिग्गज क्रिकेटपटू आणि पाकिस्तानलासाठी प्रशिक्षकपदाची भूमिका बजावलेले मॅथ्यु हेडन येण्याची शक्यता आहे. स्टार स्पोर्टशी बोलताना हेडननं सांगितलं की,मी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंचा कसा सामना करायचा हे सांगेन.या मंत्रामुळे फिरकीचं काहीच चालणार नाही.
“मला कधीही सांगा. कधीही बोलवा. मी तयारच आहे. माझ्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नक्कीच फायदा होईल.यासाठी मी कोणतंच शुल्क देखील आकारणार नाही. शेवटी प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आहे. मॅनेजमेंट संघ अडचणीत असताना माजी खेळाडूंना दूर करू शकत नाही. संघाचं नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला मदत घ्यावीच लागेल.” असं मॅथ्यु हेडन यांनी सांगितलं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने सांगितलं की, “माझ्या संघातील खेळाडू वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संवाद साधून सल्ला घेऊ शकतात.”
दुसरा कसोटी सामन्यातील विजय
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश:ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या.भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उरलेले सामने
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – होळकर स्टेडियम, इंदौर, भारत, 1-5 मार्च
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
- दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज (पहिला कसोटी सामना) – सेंचुरियन, दक्षिण अफ्रीका, 28 फेब्रुवारी-4 मार्च
- दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज (दुसरा कसोटी सामना) – जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका, 8-12 मार्च
- न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (पहिला कसोटी सामना) – क्राइस्टचर्च, न्यूजीलँड, 9-13 मार्च
- न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (दुसरा कसोटी सामना) – वेलिंगटन, न्यूजीलँड, 17-21 मार्च
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख
फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.