T20 Women World Cup च्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वाचा इथपर्यंतचा प्रवास
ब गटातील गुणतालिकेत इंग्लंडनं चार पैकी चार सामने जिंकत अव्वल स्थान कायम ठेवलं. इंग्लंडच्या खात्यात 8 गुण, तर भारताच्या खात्यात 6 गुणांची कमाई झाली. दुसरीकडे वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचा आव्हान संपुष्टात आलं आहे.
मुंबई : टी 20 वुमन्स वर्ल्डकपमधील साखळी फेरीत भारतानं चार पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीचा सामना 23 आणि 24 फेब्रुवारीला असणार आहे. तर अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी रंगणार आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. 23 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता ही लढत होणार आहे. ब गटातील गुणतालिकेत इंग्लंडनं चार पैकी चार सामने जिंकत अव्वल स्थान कायम ठेवलं. इंग्लंडच्या खात्यात 8 गुण, तर भारताच्या खात्यात 6 गुणांची कमाई झाली. दुसरीकडे वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचा आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना गेल्या 2020 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना रंगला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान चा 7 विकेट्सने पराभव केला आहे. टीम इंडियाने या विजायसह आशिया कपमधील पराभवाचा वचपा घेतला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने टीम इंडियाला विजयी केलं.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
वूमन्स टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. टीम इंडियाने वेस्टइंडिजचा 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. वूमन्स विंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. रिचा घोषने या सामन्यातही आपला तडाखा कायम ठेवत शानदार फलंदाजी केली. रिचा घोष हीने चौकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध इंग्लंड
भारताच्या महिला टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सरस प्रदर्शन केलं. पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला.इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत 20 षटकात सात गडी गमावून त्यांनी 151 धावा केल्या. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 140 धावांपर्यंत पोहोचू शकली.टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध हा सहावा पराभव आहे. महिला टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकदाही इंग्लंडला हरवता आलेलं नाही.
भारत विरुद्ध आयर्लंड
टी -20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं आयर्लंडवर 5 धावांनी विजय मिळवला आहे.भारतीय संघाने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. त्यानंतर गॅबी लुईस आमि लॉरा डेलेनीने आक्रमक खेळी सुरु केली. पण सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं आहे. या विजयासह भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यामध्ये भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.