जिंकण्यासाठी खेळले की नाही? धोनी-केदारच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे.
लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे. भारताचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला पराभव आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं. भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं, मात्र त्याच्या शतकाला विजयाचा टिळा लागला नाही.
या सामन्यात भारतीय फलंदाजांना धावांची गती राखता आली नाही. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यासारखे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले फलंदाज मैदानात होते, तरीही त्यांना सिक्सर मारता आला नाही. भारताचा पहिला षटकात 50 व्या षटकात धोनीने मारला.
हार्दिक पंड्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी आणि केदार जाधवच्या फलंदाजीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दोघांना मोठे फटकेच मारता आले नाहीत. त्यामुळे भारताचे धावांचं आणि चेंडूमधील अंतर वाढत गेलं.
45 व्या षटकात धोनीच्या साथीला केदार जाधव आला. त्यावेळी भारताला 31 चेंडूत 71 धावांची गरज होती. मात्र या दोघांना मोठे फटके मारता न आल्याने धावांचं अंतर वाढलं. हे दोघे जिंकण्यासाठी खेळतच नाहीत असंच दिसत होतं.
धोनीने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 42 धावा केल्या. तर केदार जाधवने 13 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या.
याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, “तुमच्याकडे 5 विकेट्स असूनही तुम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे तुमची मानसिकता दिसून येते”. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही धोनी आणि केदार जाधवच्या संथ फलंदाजीची चर्चा झाली. सचिन तेंडुलकरनेही धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्या सामन्यात धोनीने 84 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. भारताची मधली फळी अपयशी ठरत असल्यामुळे, आगामी सामन्यात टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेच सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे धोनी, केदार जाधव, के एल राहुल यांच्या फलंदाजीबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या
INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव