क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार
बीसीसीआयने (Bcci) इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी 20 फेब्रुवारीला 16 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे.
मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (India vs England T 2o Series) टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची शनिवारी 20 फेब्रुवारीला घोषणा करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाच्या काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झालं. तर काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. यामध्ये मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर संधी मिळाली. सूर्यकुमारला वयाच्या 30 व्या वर्षी बीसीसीआयने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली आहे. सूर्यकुमारला आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये केलेल्या मेहनतीचे फल मिळाले आहे. (india vs england t 20 series suryakumar yadav selected in team india)
टीम इंडियासाठी खेळायचं हे केवळ सूर्यकुमारचंच नाही तर त्याच्या वडीलांचे ही स्वप्न होतं. जेव्हा जेव्हा टीम इंडियाची कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात यायची, तेव्हा सूर्यकुमारचे वडील आपल्या मुलाचं नाव त्या यादीत शोधायचे. पण त्यामध्ये सूर्याचे नाव नसायचे. त्यामुळे त्यांच्या पदरी नाराजीच यायची. अखेरीस सूर्यकुमारची टीम इंडियासाठी निवड करण्यात आली. या सारखा परमोच्च क्षण हा सूर्यकुमारच्या वडीलांसाठी दुसरा कोणताच नसेल.
वडीलांच्या इच्छेखातीर क्रिकेटकडे वळला
सूर्यकुमारचं नाव आता प्रत्येकाला माहिती आहे. पण सूर्यकुमार लहानपणी क्रिकेट की बॅडमिंटन, नक्की कशात आपलं करियर करायचं, याबाबत त्याचं ठरलं नव्हतं. त्यावेळेस त्याच्या वडीलांनी त्याला क्रिकेटकडे वळण्यास सांगितलं. वयाच्या 10 व्या वर्षापासून क्रिकेटपटू व्हायचं हे निश्चित झालं. सूर्यकुमारला दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये दाखल करण्यात आले. इथून सूर्यकुमारच्या क्रिकेटर बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.
विराट कोहली विरुद्ध फर्स्ट क्लास पदार्पण
सूर्यकुमारने 2010-11 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने पदार्पणातील सामना विराट कोहली आणि शिखर धवन यासारख्या तगडे खेळाडू असलेल्या दिल्ली विरोधात खेळला. सूर्याने पदार्पणातील सामन्यात 73 धावांची खेळी केली. “या सामन्यात माझ्यासमोर शिखर आणि विराटसारखे खेळाडू होते. त्यामुळे मी दबावात आलो होतो. पण माझ्या सोबत मैदानात असलेल्या रोहित शर्माने मला धीर दिला. तु तुझ्या पद्धतीने खेळ, असा विश्वास मला रोहितने दिला”, अशी माहिती सूर्याने एका मुलाखतीत दिली होती. त्यानंतर सूर्याने मागे वळून पाहिलंच नाही. यानंतरच्या पुढील हंगामातील 9 सामन्यात त्याने 754 धावा कुटल्या. यामुळे त्याला देवधर करंडकात खेळण्याची संधी मिळाली.
आयपीएलमधील प्रवास
सूर्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मुंबई इंडियन्सने 2012 मध्ये दिली. या मोसमात त्याला केवळ 1 मॅचमध्येच खेळवण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये कोलकाताने आपल्या ताफ्यात घेतलं. सूर्या 2014-17 पर्यंत कोलकातासाठी खेळत राहिला. पण 2018 मध्ये त्याला मुंबईने पुन्हा आपल्या गोटात घेतलं. दरम्यान सूर्यकुमार आता मुंबईचा एक महत्वाचा आणि मॅचविनर खेळाडू आहे.
सूर्याची मॅचविनिंग खेळी
सूर्याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मॅचविनिंग खेळी केली होती. 29 ऑक्टोबर 2020 ला मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सूर्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 सिक्सरसह 79 धावा केल्या. सूर्याच्या या खेळीमुळे मुंबईने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. यासह मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.
विराटसोबत शाब्दिक वाद
याच सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात शाब्दिक वार पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकांकडे रोखून पाहिलं. ” हा सामना दोन्ही संघांसाठी प्ले ऑफच्या दृष्टीने महत्वाचा होता. त्यामुळे विराटने मला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर विराटने माझ्या खेळीचं कौतुक केलं” असं सूर्याने स्पष्ट केलं.
IPLमधील सर्वात यशस्वी अनकॅप्ड खेळाडू
सूर्यकुमार आयपीएलमधील सर्वात यशस्वी अनकॅप्ड (आंतरराष्टीय सामना न खेळलेला) खेळाडू आहे. सूर्या आयपीएलच्या एका मोसमात 500 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव अनकॅप्ड खेळाडू आहे. सूर्या मागील 3 मोसमांपासून सलग 400 पेक्षा अधिक धावा करतोय. सूर्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल, अशी जोरदार चर्चा होती. पण त्याला संधी न दिल्याने विराट आणि निवड समितीवर जोरदार टीका करण्यात आली होती.
भारताचा 360 डिग्री खेळाडू
दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्सला मिस्टर 360 म्हटलं जातं. एबी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करतो. तसंच सूर्या भारताचा मिस्टर 360 आहे. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता सूर्यामध्ये आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे अनेक सहकारी त्याला मिस्टर 360 डिग्री’ असंही म्हणतात.
संबंधित बातम्या :
India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी
Video : अश्विन, कुलदीप आणि हार्दिकचा जबरदस्त डान्स, साऊथ इंडियन गाण्यावर धरला ताल
(india vs england t 20 series suryakumar yadav selected in team india)