IndvsNZ ODI Live : 348 धावांचं आव्हान पार, न्यूझीलंडचा भारतावर विजय

| Updated on: Feb 05, 2020 | 3:52 PM

भारताचं 348 धावांचं भलं मोठं आव्हान न्यूझीलंडने 4 विकेट राखून पार केलं. पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

IndvsNZ ODI Live : 348 धावांचं आव्हान पार, न्यूझीलंडचा भारतावर विजय
Follow us on

India vs New Zealand ODI हॅमिल्टन : भारताचं 348 धावांचं भलं मोठं आव्हान न्यूझीलंडने 4 विकेट राखून पार केलं. पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित 50 षटकात 4 बाद 347 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने हे आव्हान 11 चेंडू राखून 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.  न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने नाबाद शतक झळकावून, विजयात मोठा वाटा उचलला. टेलरने 84 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार ठोकात नाबाद 109 धावा केल्या.

पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. भारताकडून श्रेयस अय्यरचं शतक, के एल राहुलच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर 347 धावांचा डोंगर रचला होता. मात्र न्यूझीलंडने हे आव्हान जवळपास दोन षटकं राखून पार केलं.

न्यूझीलंडचा सलामीवीर निकोल्स 78 आणि कर्णधार टॉम लॅथमने 69 धावा करुन न्यूझीलंडच्या विजयात हातभार लावला. भारताकडून कुलदीप यादव 2 तर शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमीला प्रत्येक एक विकेट घेता आली.

त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने खणखणीत शतक झळकावलं. श्रेयसने 101 चेंडूत शतकाला गवसणी घातली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. श्रेयसचं हे वन डेतील पहिलं शतक ठरलं.  107 चेंडूत 103 धावा करुन अय्यर माघारी परतला. टीम साऊदीने त्याला बाद केलं. अय्यर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 45.3 षटकात 4 बाद 292 अशी होती. श्रेयस अय्यर-राहुलने चौथ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या के एल राहुलनेही फटकेबाजी करत 64 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या. राहुलने 41 चेंडूत 4 षटकार ठोकत अर्धशतक झळकावलं.

पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताकडून फ्रेश सलामीवीर मैदानात उतरले. मुंबईकर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. पृथ्वी शॉने 21 चेंडूत 20 तर मयांक अग्रवालने 31 चेंडूत 32 धावा केल्या.

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. 63 चेंडूत 51 धावा करुन तो बाद झाला. कोहली-श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली.

कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने के एल राहुलच्या साथीने खेळाची सूत्रे हाती घेतली. दुसरीकडे टी 20 फॉर्ममध्ये असलेल्या राहुलने आपला तोच फॉर्म वन डेतही कायम ठेवला. राहुलने 4 षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर राहुलने केदार जाधवच्या साथीने फटकेबाजी चालूच ठेवली. राहुलने 64 चेंडूत 6 षटकार आणि 3चौकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या. तर केदार जाधव 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावांवर नाबाद राहिला.