World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंमध्ये खरी टक्कर
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. भारत विरुद्ध पाक सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले, तरीही खरी टक्कर मात्र याच पाच खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार आहे.
India vs Pakistan | मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. जर दोन्ही टीमचा विचार केला तर, पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडं नक्कीच जड आहे. पण पाकिस्तानलाही नजर अंदाज करुन चालणार नाही. कारण यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानाने इंग्लंडला चांगलीच मात दिली. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे. भारत विरुद्ध पाक सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले, तरीही खरी टक्कर मात्र याच पाच खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार आहे.
रोहित शर्मा विरुद्ध फखर जमान
फखर जमान हा पाकिस्तानचा सर्वात धडाकेबाज फलंदाज आहे. तर भारतचा सलामीवीर रोहित शर्माही चांगलाच फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा फलंदाजी करण्यास उतरला आणि तो काही वेळ क्रीझवर टिकून राहिला, तर भारत 50 षटकात मोठी धावसंख्या उभारेल. त्या तुलनेत फखर जमान हा पाकिस्तानचा वेगवान फलंदाज आहे. जर रोहित शर्मा लवकर आऊट झाला नाही, तर कोणत्याही गोलंदाजाला रोहितला थांबवणं शक्य होणार नाही.
बाबर आजम विरुद्ध विराट कोहली
वन डे सामन्यात बाबर आजमचा स्ट्राईक रेट 86 हून अधिक आणि सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 90 पेक्षा अधिक असून सरासरी जवळपास 60 आहे. म्हणजेच हे दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगलीच टक्कर देणारे ठरु शकतात.
एम. एस. धोनी विरुद्ध सरफराज अहमद
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीची तुलना पाकिस्तानच्या कर्णधार सरफराज अहमदशी केली जाते. या दोन्ही खेळाडूंकडे मोठे सामने खेळल्याचा अनुभव आहे. तसेच हे दोन्ही खेळाडू मैदानात व्यवस्थित योजना आखतात आणि खेळतात. दोन्ही खेळाडू सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात करत असले, तरी देखील हे खेळाडू आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
जसप्रीत बुमराह विरुद्ध मो. आमिर
टीम इंडियाचा फिरकीपटू जसप्रीत बुमराह हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. या विश्वचषकात बुमराहसारखी वेगवान, भेदक गोलंदाजी अद्याप कोणीही केलेली नाही. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा भारतासाठी घातक ठरू शकतो. मोहम्मद आमीरने सध्या विश्वचषकात सर्वाधिक 10 विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर केवळ 30 धावा देत आमीरने 5 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही आमिरपासून सावध राहण्याचा सल्ला टीम इंडियाला दिला आहे.
युजवेंद्र चहल विरुद्ध शादाब खान
भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहलने यंदाच्या विश्वचषकातील विरोधी टीमच्या नाकी नऊ आणले आहेत. चहलने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. त्या विरुद्ध शादाब खान हा पाकिस्तानचा चांगला गोलंदाज आहे. शादाब उत्तम गोलंदाजीप्रमाणे तितकीच चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध पाक सामन्यात कोण कोणाला टक्कर देणार, हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचं ठरेल.
संबंधित बातम्या
World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?
जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला
भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे
हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी