IND vs PAK मॅचवर नवं संकट, एका गोष्टीमुळे सामना धोक्यात,क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली !
India vs Pakistan T20 World Cup Match : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी 36 हजार सीट्स असलेले नॅसो काऊंटी स्टेडिअम संपूर्णपणे भरलेले असेल अशी अपेक्षा आहे. तसेच या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. परंतु या सर्व व्यवस्था 9 जूनच्या सकाळी निष्फळ ठरू शकतात कारण न्यूयॉर्कचे हवामान खराब आहे. त्यामुळे सगळा गेमच पलटू शकतो.

सर्वांनाच उत्सुकता असलेला भारत वि पाकिस्तान सामना आज न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. अमेरिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राहणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. कारण क्रिकेट जगतातील सर्वात मोठा सामना यावेळी चाहत्यांना याची देही याची डोळा पहायला मिळणार आहे. T20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील सर्वात मोठा, लाखो चाहत्यांच्या नजरा ज्यावर खिळल्या आहेत, तो सामना आज ( रविवार, 9 जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबद्दल केवळ अमेरिकेतील क्रिकेट प्रेमींनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण हे थ्रिल आणि उत्साह यावर कोणी पाणी ओतलं तर सगळ्यांचाच भ्रमनिरास होऊ शकतो. या सामन्यातही असंच काहीसं घडू शकतं आणि चाहत्यांची ( भारत वि, पाक मॅच पाहण्याचीी) प्रतीक्षा आणखी वाढू शकते.
ग्रुप ए मधील या सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर जोरदार तयारी सुरू आहे. चाहत्यांची मोठी गर्दीही होईल. त्या दृष्टिकोनातून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि दोन्ही संघांची तयारीही झाली आहे. हा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना या स्पर्धेत पुढे जाणे कठीण ठरू शकते. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे, जेणेकरून ते या स्पर्धेत कोणत्याही अडचणींशिवाय पुढील फेरी गाठू शकतील.
नासाऊ काउंटीचे हवामान बेभरवशी
या सामन्यासाठी कितीही जय्यत तयारी करण्यात आली असली तरी हे सगळं एका क्षणात उद्धव्सत होऊ शकतं आणि संपूर्ण सामनाच संकटात सापडू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे नासाऊ काऊंटीमधील वातावरण बेभरवशी आहे, त्यामुळे सामन्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. नासाऊ काउंटीमध्ये 9 जून रोजी सकाळी हवामान चांगले राहणार नाही आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नासाऊ काउंटीमध्ये सकाळच्या सुमारास पावसाची सुमारे 61 टक्के शक्यता आहे. भारतात जरी हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळणार असला तरी अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 पासून हा सामना सुरू होईल. अशा स्थितीत सकाळी पाऊस झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ शकतो आणि सगळ्यांच्याच उत्साहावर पाणी पडेल.
सर्वात मोठे आव्हान म्हणजे या स्टेडियममधील ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची नाही. कारण हे केवळ तात्पुरते स्टेडियम म्हणून बांधण्यात आले आहे. अशा स्थितीत तेथे एवढ्या सुविधा उपलब्ध करणे आणि ते स्टेडिअम लगेच खेळण्यायोग्य बनवणे शक्य होईल का, असाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. परिस्थिती जास्तच बिघडली तर हा सामना रद्द होऊ शकतो कारण लीग स्टेजमध्ये रिझर्व्ह डेचा ( राखीव दिवस) नियम नाही. त्यामुळे असंख्य क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास होऊ शकतो.
फायदा कोणाला ?
आता अशी परिस्थिती उद्भवली तर फायदा कोणाला होणार? वास्तविक, दोन्ही संघांना थोडाफार फायदा होईल. पाकिस्तानला इथे जास्त फायदा होईल कारण किमान त्यांचे गुणखाते उघडले जाईल. अन्यथा पाकिस्तान आणि भारत ज्या फॉर्ममध्ये आहेत, त्यात पाकिस्तान जिंकेल अशी आशा नाही. जर पाकिस्तानला 1 गुण मिळाला तर तो संघ पुढील 2 सामन्यांमध्ये कॅनडा आणि आयर्लंडला पराभूत करून सुपर-8 मध्ये स्थान मिळवू शकतो. टीम इंडियाचा विचार केला तर फारसा फरक पडणार नाही कारण यानंतर टीम इंडियाचा सामना अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध असेल आणि तेथील विजय त्यांच्यासाठी फार कठीण नसेल.