INDvsPAK : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान भारतासाठी लकी?
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. इंग्लंडमधील मॅनचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. विशेष म्हणजे हे मैदान टीम इंडियासाठी लकी मानलं जातं.
India vs Pakistan | मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. या सामन्यात अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला.
भारतासाठी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान ‘लकी’?
दरम्यान मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात 1999 च्या विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान हा पहिला सामना खेळवण्यात आला होता. हा सामना 8 रोजी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टीम इंडियाने 50 षटकांत 227 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान 180 धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने 47 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू वेंकटेश प्रसादने 5 बळी घेतले. तर द्रविड आणि अझहरुद्दीने अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे टीम इंडियाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियासाठी हे मैदान लकी मानलं जातं.
वनडे सामन्यात पाकिस्तान वरचढ
मात्र वनडे सामन्यात भारतापेक्षा पाकिस्तान वरचढ आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 131 आंतरराष्ट्रीय वन डे सामने झाले. यापैकी 73 सामने पाकिस्तानने तर 54 सामने भारताने जिंकले, 4 सामने अनिर्णित राहिले. मात्र विश्वचषकातील 6 पैकी 6 सामन्यात भारताने विजय मिळवला.
2011 मध्ये भारत विश्वविजेता
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये विश्वचषकात आतापर्यंत 6 वेळा सामने रंगले. भलेही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात भारताला अनेकवेळा हरवलं असलं, तरी भारताने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. 2011 च्या विश्वचषकावेळी पाकिस्तानला उपांत्य सामन्यात पराभूत करुन अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात श्रीलंकेचा दारुण पराभव करत टीम इंडियाने दुसऱ्यांदा विश्वविजेत्याचा किताब आपल्या नावे केला होता.
2017 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव
तर दुसऱ्या बाजूला 2017 च्या चॅम्पियन ट्राफी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आतापर्यंत पाचवेळा अंतिम सामन्या भारत पाकिस्तान आमने-सामने आले आहेत. त्यात तीन वेळा पाकिस्तान तर दोन वेळा भारताने विजय मिळवला आहे. भारताने 2002 आणि 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. 2002 मध्ये भारताने श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद भूषवलं होतं. तर 2013 मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.
या विश्वचषकात भारताचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत, ज्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ 5 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानने चार सामने खेळले असून दोन पराभवांचा सामना करावा लागलाय. पाकिस्तानचाही एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
16 जूनला, रविवारी म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी दुपारी हलकासा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मँचेस्टरमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. स्थानिक वेळेनुसार मँचेस्टरमध्ये सामना सकाळी 10.30 वाजता सुरु होईल, त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला काहीच अडथळा येणार नसल्याचे दिसते आहे. मात्र सामना मध्यावर आल्यानंतर पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
पावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्डकपमधील सामने रद्द होत असल्याने, क्रिकेट रसिकांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं गेलं.
संबंधित बातम्या
World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?
जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला
भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे
हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी