IndvsWI : भारताचा वेस्ट इंडिजवर 107 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडियाच्या 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची टीम 43.3 षटकांमध्ये केवळ 280 धावाच करु शकली. भारताने वेस्ट इंडिजवर तब्बल 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
( India vs West Indies ODI) विशाखापट्टणम : रोहित शर्माचं (Rohit Sharma) दीडशतक आणि के एल राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 388 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची टीम 43.3 षटकांमध्ये केवळ 280 धावाच करु शकली. भारताने वेस्ट इंडिजवर तब्बल 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून रोहित शर्माने 159 धावा, तर राहुलने 102 धावांची तुफान खेळी केली. या दोघांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 5 बाद 387 धावा ठोकल्या. ( India vs West Indies ODI)
टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या विंडिजसाठी हा निर्णय चांगलाच महागात ठरला. भारतीय सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत, 227 धावांची सलामी दिली. रोहित-राहुलने विंडिज फलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. दोघांनीही आपली वैयक्तिक शतकं झळकावली. रोहितने 107 चेंडूतर तर राहुलने 102 चेंडूत शतकाला गवसणी घातली. रोहितने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकार ठोकत 159 धावा कुटल्या. दुसरीकडे के एल राहुलनेही 104 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 102 धावा केल्या.
कर्णधार विराट कोहलीला एकही धाव करता आली नाही. पोलार्डने त्याला आल्या पावली माघारी धाडलं. पहिल्याच चेंडूवर कोहली बाद झाला. यानंतर मग हार्ड हिटर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी खेळाची सूत्रं हाती घेतली. श्रेयस अय्यरने अवघ्या 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला ऋषभ पंतने 16 चेंडूत 39 धावा ठोकून जबरदस्त साथ दिली. पंतनेही 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
यानंतर मग केदार जाधवने अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी करत 10 चेंडूत 16 धावा केल्या. रवींद्र जाडेजा शून्यावर नाबाद राहिला. विंडीजकडून शेल्डन कॉर्टेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
भारताच्या 388 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक 78 धावा केल्या. निकोलस पूराण याने देखील 75 धावांची दमदार कामगिरी केली. मात्र, त्यांची ही खेळी वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. वेस्ट इंडिजचा अख्खा संघ केवळ 280 धावांमध्ये गारद झाला. भारताचे गोलंदाज मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी तीन विकेट घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला.