World Cup : टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट आज पक्कं होणार?
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाचा सामना आज (27 जून) जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होणार आहे. इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये दुपारी 3 वाजता टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजसोबत भिडणार आहे.
India vs West Indies (इंग्लंड) : विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाचा सामना आज (27 जून) जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होणार आहे. इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये दुपारी 3 वाजता टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजसोबत भिडणार आहे. दरम्यान सध्या 10 संघांच्या गुणतालिकेत भारत 9 गुणांसह तिसऱ्या, तर वेस्ट इंडिज 3 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. विश्वचषक मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. तर टीम इंडियाने हा सामना जिंकल्यानंतर त्यांचे उपांत्य फेरीची तिकीट पक्कं होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे.
यंदाच्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विडींजचा संघ ढेपाळत गेला. त्यामुळे विडींज उपांत्य फेरी गाठण्याची संधी गमवल्यात जमा आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्यात विडींजने विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकातील सहावा सामना खेळणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर इतर चार सामान्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे विडींजच्या तुलनेत टीम इंडिया चांगलीच फॉर्ममध्ये आहे.
वेस्ट इंडिजला सामन्याआधी धक्का
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी सुनील आंब्रिसचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच रसेल गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. मात्र त्रास वाढल्याने तो मायदेशी परतला आहे. सुनीलने सप्टेंबर 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तो फक्त सहा सामने खेळला असून नुकत्याच झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याने 148 धावांची विक्रमी खेळी केली होती.
टीम इंडियावरही दुखापतीचं ग्रहण
दरम्यान, वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 16 जून रोजी झालेल्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. धवनऐवजी विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. आता धवन संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे.
तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचीही दुखापत गंभीर असल्याने तो पुढील 2 ते 3 सामने मुकणार आहे. भुवी सध्या फिजिओंच्या देखरेखीत आहे. येत्या 30 जूनला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवी खेळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
सामन्यावर पावसाचं सावट
दरम्यान मॅनचेस्टरच्या मैदानात सध्या पावसाचे सावट आहे. मंगळवारी (25 जून) इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये दिवसभर पाऊस पडत होता. पावसामुळे टीम इंडियाने आपला सरावही इनडोअर केला होता. त्यामुळे जर आज विंडीज विरुद्ध होणार सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. त्यामुळे भारताच्या खात्यात 10 गुणसंख्या होईल. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी फक्त दोन सामने जिंकावे लागतील.