Ind vs WI | टीम इंडियाकडून विंडीजचा 318 धावांनी धुव्वा, परदेशी भूमीवरील सर्वाधिक धावांच्या अंतराने विजय
टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 419 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. हा परदेशी भूमीत भारताने सर्वाधिक धावांच्या अंतराने मिळवलेला कसोटी विजय ठरला आहे.
India Vs West Indies अँटिगा : अँटिगा कसोटीच्या (Antigua Test) चौथ्या दिवशीच टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजचा (West Indies) 318 धावांनी धुव्वा उडवला. परदेशी भूमीत भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली. तर अजिंक्य रहाणेने दोन वर्षांनंतर दमदार कसोटी शतक लगावलं.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 419 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची पुरती दमछाक झाली. वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. हा परदेशी भूमीत भारताने सर्वाधिक धावांच्या अंतराने मिळवलेला कसोटी विजय ठरला आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 102 धावांची दमदार खेळी उभारली. त्याला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. तर हनुमा विहारीचं अर्धशतक ‘नर्व्हस नाईन्टीज’मध्ये हुकलं. हनुमाने दहा चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. कर्णधार कोहलीने 51 धावांचं योगदान दिलं.
अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आपला दुसरा डाव सात बाद 343 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 418 धावांची भली मोठी आघाडी घेता आली.
भारताकडून जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावात सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर नांगी टाकली. नवव्या क्रमांकावर उतरलेला विंडीजचा फलंदाज केमार रोशने केलेल्या 38 धावा सर्वाधिक ठरल्या.
‘अजिंक्य’ रहाणे
अजिंक्य रहाणेचं गेल्या दोन वर्षातलं हे पहिलंच, तर कारकीर्दीतलं दहावं शतक ठरलं. ऑगस्ट 2017 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कोलंबो कसोटीत अखेरची शतकी खेळी केली होती. विंडीजविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 81 धावा केल्या. आता दुसऱ्या डावात शतक झळकावलं.
धोनीच्या ‘विराट’ विजयाशी बरोबरी
अँटिगा कसोटीतला विजय हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला 27 वा विजय ठरला. या विजयासह कोहलीने सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीने कर्णधारपदी असताना आपल्या कसोटी कारकीर्दीत 60 सामन्यांमध्ये 27 विजयच मिळवले होते.
विराटने परदेशात सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीने कारकीर्दीत परदेशात अकरा कसोटी सामने जिंकले होते. अँटिगा कसोटीत मिळालेला विजय हा विराटच्या नेतृत्वात भारताने परदेशात मिळवलेला बारावा विजय होता.