Vasant Raiji | क्रिकेटचा चालता-बोलता इतिहास हरपला, भारतातील सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचं शंभराव्या वर्षी निधन
वसंत रायजी यांचा जन्म 26 जानेवारी 1920 रोजी झाला. रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. (India’s oldest first-class cricketer Vasant Raiji dies at 100)
मुंबई : भारतातील सर्वात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत रायजी यांच्या निधनाने क्रिकेटचा चालता-बोलता इतिहास हरपल्याच्या भावना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या आहेत. (India’s oldest first-class cricketer Vasant Raiji dies at 100)
वृद्धापकाळामुळे दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी त्यांचे निधन झाले, अशी माहिती वसंत रायजी यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी दिली. वसंत रायजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि जावई असा परिवार आहे. दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत आज (शनिवारी) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.
कोण होते वसंत रायजी?
वसंत रायजी यांचा जन्म 26 जानेवारी 1920 रोजी झाला. रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी रचलेल्या 277 धावांमध्ये 68 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. नागपूर येथे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ संघातून त्यांनी पदार्पण केले. तर विजय मर्चंट यांच्या नेतृत्वात 1941 मध्ये पश्चिम भारत संघ खेळला, तेव्हा रायजी यांचे मुंबई पदार्पण झाले.
रायजी हे चार्टर्ड अकाऊंटंट आणि क्रिकेट इतिहासकार म्हणूनही नावाजले गेले. त्यांनी लिहिलेली 8 अनमोल पुस्तके क्रिकेटच्या इतिहासाचे दुर्मिळ साहित्य मानले जाते.
BCCI mourns the sad demise of Vasant Raiji. The former first-class cricketer and historian, who turned 100 this year in January, passed away in his sleep.https://t.co/0ywSprK93o pic.twitter.com/Z44gmP76X7
— BCCI (@BCCI) June 13, 2020
26 जानेवारी 2020 रोजी वसंत रायजी यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली, त्यावेळी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही वाचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम
“रायजींनी आठ दशके भारतीय क्रिकेट पाहिले आणि असंख्य क्रिकेटपटूंशी संवाद साधला. त्यांच्याइतके क्रिकेटचे अगाध ज्ञान क्वचितच कोणाला असेल. रायजी यांनी कधीच दोन खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारची तुलना केली नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य” असे क्रिकेट लेखक मकरंद वायंगणकर यांनी ‘बॉम्बे बॉईज’ या पुस्तकात लिहिले आहे.
(India’s oldest first-class cricketer Vasant Raiji dies at 100)