भारताचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव
वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे. कर्णधार रोहित शर्मा […]
वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे.
कर्णधार रोहित शर्मा केवल एक धाव करुन माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. विजय शंकरने शिखर धवनच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण शिखर धवन 29 आणि विजय शंकर 27 धावांवर बाद झाले. यानंतर रिषभ पंतही केवळ चार धावा करुन माघारी परतला.
यानंतर आलेल्या धोनीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ देण्यासाठी कुणीही तग धरु शकलं नाही. दिनेश कार्तिक 5, हार्दिक पंड्या 4, भुवनेश्वर कुमार 1 अशा एकेरी धावसंख्येवर सर्व गडी माघारी परतले. अखेर धोनीही 39 धावांवर बाद झाला, ज्यामुळे 19.2 षटकात भारताला फक्त 139 धावा करता आल्या.
त्याआधी भारतीय गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. सीफर्ट 84, कोलिन मुन्रो, 34, केन विल्यम्सन 34 यांनी मोठं योगदान दिलं. याशिवाय खालच्या फळीतल्या फलंदाजांनीही मोलाची भूमिका निभावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना वेळीच वेसन न घालता आल्याने भारतासमोर मोठी धावसंख्या उभी राहिली.
भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत चार षटकांमध्ये 47 धावा लुटल्या. दोन विकेट घेणाऱ्या हार्दिक पंड्याचीही धुलाई झाली. त्याने सर्वाधिक 51 धावा दिल्या. खलील अहमदने एक विकेट घेत 48 धावा, यजुवेंद्र चहलने एक विकेट घेत 35 आणि कृणाल पंड्याने एक विकेट घेत 37 धावा लुटल्या.
भारतीय महिला संघाचाही पराभव
दुसरीकडे याच मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध भारतीय महिला संघाचा सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा 23 धावांनी पराभव झाला. स्मृती मंधानाच्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही उर्वरित नऊ विकेट केवळ 34 धावांमध्ये पडल्या, ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला संघाची धावसंख्या 11.2 षटकांमध्ये 102/1 अशी होती. पण त्यानंतर केवळ 34 धावा भारतीय महिला संघाने नऊ विकेट गमावल्या.