भारताचं सेमीफायनलचं तिकीट बूक, बांगलादेशचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
CWC 2019 लंडन : टीम इंडियाने विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलचं तिकीट बूक केलंय. बांगलादेशवर 28 धावांनी मात करत भारताने 13 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान काबिज केलं. यासोबतच बांगलादेशचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलंय. विजयासाठी 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद 286 धावा करता आल्या. मोहम्मद शमीने पहिली विकेट मिळवून दिली, ज्यानंतर हार्दिक पंड्याने तीन फलंदाजांना माघारी धाडून बांगलादेशचं कंबरडं मोडलं आणि चार विकेट घेऊन जसप्रीत बुमराने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत मोलाचं योगदान दिलं.
विजयासाठी भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत संघर्ष करायला लावला. शकीब अल हसन (66), सब्बीर रहमान (36) आणि शेवटी मोहम्मद सैफुद्दीनने (51*) भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध 6 तारखेला होईल, ज्यानंतर सेमीफायनलचे सामने सुरु होतील. नियमानुसार, पहिल्या आणि चौथ्या संघाचा आणि दुसऱ्या-तिसऱ्या संघात सेमीफायनल होईल. भारताला पुढील सामना जिंकून पहिल्या स्थानावर येण्याची संधी आहे. मात्र सध्या पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम राहिल.
रोहित शर्माचं विश्वचषकातलं चौथं शतक
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित 50 षटकात 9 बाद 314 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 315 धावांची गरज होती. भारताकडून रोहित शर्माने आणखी एक शतक झळकावत, विश्वचषकातील चौथ्या शतकाची नोंद केली. रोहित शर्मा 104, लोकेश राहुल 77 आणि ऋषभ पंतच्या 48 धावांच्या जोरावर भारताला इथवर मजल मारता आली. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. मधल्या फळीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या केदार जाधवच्या जागी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला. तर फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा टीम इंडियात समावेश करण्यात आला.
भारतीय संघात चार विकेटकीपर
दिनेश कार्तिकच्या समावेशामुळे भारतीय संघात आज चार विकेटकीपर खेळत होते. महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि आयपीएलमध्ये विकेटकीपिंग करणारा के एल राहुल हे टीम इंडियात आहेत. तब्बल चार विकेटकीपर खेळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ असावी. दिनेश कार्तिकने 2018 च्या निदास ट्रॉफीत बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारुन मॅच जिंकली होती.
याशिवाय दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारने पुन्हा संघात स्थान मिळवलं. भुवीऐवजी संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने केवळ 3 सामन्यात 13 विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे शमीला टीम इंडियात कायम ठेवण्यात आलं. आजच्या सामन्यात कुलदीपला वगळून भुवीला घेण्यात आलं.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात धोनी आणि केदार जाधवने अतिशय संथ फलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. त्याचा परिणाम म्हणून केदार जाधवला बसवण्यात आलं.