IPL 2020, KXIP vs DC : दिल्लीसाठी दिलासादायक बातमी, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीतून बरा, पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता
दुखापतग्रस्त दिल्लीसाठी दिलासादायक बातमी आहे.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 37 वा सामना किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला आज (20 ऑक्टोबर) संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दिल्लीला प्लेऑफ फेरीत पोहचण्यासाठी अवघ्या 1 विजयाची आवश्यकता आहे. तर पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीतलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. मात्र दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतीतून सावरला आहे. तो पूर्णपणे फीट झाला आहे. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत खेळण्याची शक्यता आहे. IPL 2020 Delhi Capitals Attacking Player Rishabh Pant Recovers From Injury Likely To Play Against Punjab
मुंबई इंडियन्सविरुद्ध 11 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला होता. “ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याला काही दिवस खेळता येणार नाही”, अशी माहिती कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यानंतर दिली होती. यानंतर पंतला फीट होण्यासाठी आणखी दिवस लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे आधीच दुखापतीचं ग्रहण लागलेल्या दिल्लीच्या चिंतेत भर पडली होती. मात्र आता पंत फीट असल्याने तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिल्लीला दुखापतीचं ग्रहण
यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच दिल्लीच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागंल आहे. पहिल्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या खांद्याला दुखापत झाली होती. आयपीएलच्या 13 व्या मोसमात दिल्लीने शानदार कामगिरी केली आहे. मात्र खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने दिल्लीला फटका बसला. दुखापतीमुळे दिल्लीचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा आणि अमित मिश्राला आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घ्यावी लागली. मात्र अमित मिश्राच्या जागी दिल्लीत युवा फिरकीपटू स्थान देण्यात आलं आहे. प्रवीण दुबे असं या फिरकीपटूचं नाव आहे.
कोण आहे प्रवीण दुबे?
प्रवीण दुबे हा लेग स्पीनर आहे. प्रवीण हा कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व करतो. या 27 वर्षीय प्रवीणने कर्नाटककडून 14 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6.87 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2016 आणि 2017 मध्ये प्रवीणचा आपल्या गोटात समावेश केला होता. मात्र त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. प्रवीणला आता दिल्लीच्या संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रवीण कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे दिल्लीच्या समर्थकांच लक्ष असणार आहे.
शिखर धवनला विक्रमाची संधी
शिखर धवनला आयपीएलध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. धवनला 5 हजार धावा करण्यासाठी अवघ्या 62 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे आजच्या पंजाबविरुद्च्या सामन्यात धवनने 62 धावा केल्या, तर तो 5 हजार धावा करणारा चौथा भारतीय तर पाचवा ओव्हरऑल फलंदाज ठरेल. शिखरने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 168 सामने खेळले आहेत. यात त्याने 125 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 938 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी
IPL 2020, KXIP vs DC : ‘गब्बर’ शिखर धवनला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी
IPL 2020 Delhi Capitals Attacking Player Rishabh Pant Recovers From Injury Likely To Play Against Punjab