हर्षल पटेलकडून रोहित शर्माचा 12 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे.
चेन्नई : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (IPL 2021, MI vs RCB : Harshal Patel breaks Rohit Sharma’s 12-year-old record)
आजच्या सामन्यात मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईविरोधात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड याआधी रोहित शर्माच्या नावावर होता. होय! सध्याचा मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने हैदराबाद डेक्कन चार्जर्स (Hyderabad Deccan Chargers) संघाकडून खेळताना मुंबईविरोधातील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. रोहितने मुंबईविरोधात 6 धावात 4 बळी घेण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे यात रोहितने हॅट्ट्रिकदेखील घेतली होती. रोहितचा हाच रेकॉर्ड आज हर्षलने मोडीत काढला आहे.
रोहितचा रेकॉर्ड
2009 साली म्हणजेच आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात रोहितने त्याची गोलंदजीतली सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा रोहित हैदराबादच्या संघाकडून खेळत होता. 6 मे 2009 रोजी खेळवण्यात आलेल्या मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने 145 धावा केल्या होत्या. त्यानंतर 146 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात केवळ 8 बाद 126 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात हैदराबादकडून रोहित शर्माने सर्वाधिक 4 बळी घेतले होते. त्याने 2 षटकात 6 धावा देत मुंबईच्या चार फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. तसेच फलंदाजीत त्याने 38 धावा फटकावल्या होत्या.
RCB चा तिसरा सर्वोत्तम गोलंदाज
दरम्यान, हर्षल पटेलने आज अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी हर्षलने केली आहे. हर्षलने आज 27 धावांत 5 बळी मिळवले आहेत. आरसीबीकडून याआधी गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि जयदेव उनादकटच्या नावे होती. उनादकटने 25 धावांत 5 बळी घेण्याचा विक्रम केला होता. तर दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने 5 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली होती.
हर्षल पटेलची दमदार कामगिरी
आजच्या सामन्यात सुरुवातीला मुंबईच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता. परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याला पायचित (LBW) पकडत पहिलं यश मिळवलं. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने इशान किशनला बाद करत दुसरं यश मिळवलं. वैयक्तिक चौथ्या आणि सामन्यातील 20 व्या षटकात हर्षलने तीन विकेट्स घेतल्या. परंतु त्याला हॅटट्रिक साधता आली आहे. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने कृणाल पंड्याला डॅन ख्रिश्चनकरवी झेलबाद केलं, त्या पुढच्याच चेंडूवर त्याने कायरन पोलार्डला वॉशिंग्टन सुंदरकडे झेल ध्यायला भाग पाडलं. पुढच्या चेंडूवर त्याला हॅट्ट्रिकची संधी होती खरी, परंतु Marco Jansen ने हा चेंडू खेळून काढला. परंतु त्या पुढच्या चेंडूवर हर्षलने Jansen ला त्रिफळाचित केलं. अशा पद्धीने पटेलने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेत यंदाच्या हंगामाचा श्रीगणेशा केला आहे.
काय म्हणाला हर्षल पटेल?
मुंबईचा डाव संपल्यानंतर समालोचकांशी बोलताना पटेल म्हणाला की, तुम्ही केवळ तुमच्या विरोधी संघाकडे पाहून चालत नाही, तुमचं नियोजन आणि अंमलबजावणीवर (planning and execution) लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला आधीच माहिती होतं की मला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु शेवटच्या षटकात मला तीन बळी मिळाले. त्यामुळेच मला पाच बळींचा टप्पा (five-wicket haul) पूर्ण करता आला. माझं हे यश मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरोधातलं आहे, याचाही आनंद आहे.
हर्षल पटेलची क्रिकेट कारकीर्द
हर्षल पटेल आयपीएलमध्ये यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. आपल्या आयपीएल कारकीर्दीत पटेलने 48 सामन्यांमध्ये 46 बळी घेतले आहेत. 28 धावांत 3 बळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. परंतु आजच्या सामन्यानंतर 27 धावांत 5 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हर्षल पटेलने आतापर्यंत 64 सामन्यांमध्ये 113 डावात 226 बळी मिळवले आहेत. 34 धावात 8 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 57 सामन्यांमध्ये 80 बळी मिळवले आहेत. 21 धावात 5 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तर आतापर्यंत 96 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 98 बळी मिळवले आहेत. 14 धावात 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
संबंधित बातम्या
यंदाही मुंबईची पहिली मॅच देवाला, सलग 9 वर्ष सलामीला हरले
Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ
(IPL 2021, MI vs RCB : Harshal Patel breaks Rohit Sharma’s 12-year-old record)