आयपीएलमध्ये बुधवारी (आज 14 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची आजवरची आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 10 सामने डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादने तर 7 सामने विराटच्या आरसीबीने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. या 18 सामन्यांमध्ये आयपीएल 2016 च्या अंतिम सामन्याचादेखील समावेश आहे. या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर मात करत दुसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला होता.
आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने फटकावल्या आहेत, तर हैदराबादसाठी सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकावल्या आहेत. वॉर्नरने बंगळुरुविरुद्ध 593 धावा फटकावल्या आहेत. तर विराटने हैदराबादविरुद्ध 531 धावा फटकावल्या आहेत.
आयपीएल 2020 मध्ये लीग राऊंडमध्ये दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी त्यावेळी एकेक सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आले. हा सामना हैदराबादने जिंकला होता.