मुंबई: पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (PBKS vs DC) सोमवारी सामना झाला. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. विजेत्या संघाचा प्लेऑफचा मार्ग थोडा सुकर होणार होता. या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. दिल्लीने IPL 2022 प्लेऑफच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकलं आहे. या सामन्यात पंजाबचा पराभव झाला. पंजाबच्या पराभवादरम्यान अशी एक गोष्ट घडून गेली की, पंजाबच्या कंपूत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले आहेत. पंजाबच्या कोचिंग कॅम्पमध्ये गोंधळ दिसून आला. एका फलंदाजाला पाठवताना हा गोंधळ दिसला. यामुळे पंजाबचे हेड कोच अनिल कुंबळे (Anil Kumble) नाराज झाले.. पंजाबला विजयासाठी 160 धावांचं टार्गेट मिळालं होतं. जॉनी बेयरस्टोने मैदानावर येताच फटकेबाजी केली. पण त्याचा विकेट गेल्यानंतर झटपट काही विकेट गेल्या. त्यामुळे कोणाला पाठवायचं आणि कोणाला नाही, यावरुन गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कोच अनिल कुंबळे यांना दुसऱ्याच फलंदाजाला पाठवायचं होतं. पण फलंदाज आधीच मैदानावर निघाला होता. त्यामुळे अंपायपला मध्ये हस्तक्षेप करावा लागला.
पंजाबच्या डावात सातव्या षटकामध्ये हा प्रकार घडला. अक्षर पटेलने तिसऱ्या चेंडूवर कॅप्टन मयंक अग्रवालला बोल्ड केलं. त्यानंतर जितेश शर्मा फलंदाजीसाठी मैदानावर जात होता. बाऊंड्री क्रॉस करुन जितेशने मैदानात पाऊल टाकलं. तितक्या कोच अनिल कुंबळे ओरडले. त्यांनी जितेशला माघारी बोलावलं. जितेश माघारी डग आऊट मध्ये येत होता. त्यावेळी चौथ्या अपांयरने माघारी फिरण्यापासून रोखलं. कारण नियमानुसार खेळाडूने मैदानावर पाऊल ठेवलं, तर तो माघारी फिरु शकत नाही. आता या प्रकारामुळे पंजाबच्या टीम मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित होतोय. संघाचा प्लान दुसऱ्या कोणाला पाठवायचा होता, मग त्याची जितेशला कल्पना का नाही दिली?
पंजाबचा या सामन्यात 17 धावांनी पराभव झाला. दिल्लीच्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने निर्धारित 20 षटकात 142 धावाच केल्या. या पराभवामुळे पंजाबचा पुढचा मार्ग खडतर झाला आहे. आता पंजाबला शेवटच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. त्याशिवाय दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहाव लागेल. जितेशने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही. त्याने 34 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 44 धावा फटकावल्या.