KKR vs RCB IPL 2023 : कोलकात्याच्या मिस्ट्री बॉलर श्रेयसचा जबरदस्त इम्पॅक्ट, 19 वर्षीय फिरकीपटू आहे तरी कोण? जाणून घ्या
आयपीएल 2023 स्पर्धेच्या नवव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने युवा गोलंदाज सुयश शर्माला संधी दिली. लांब केस असलेल्या तरुण गोलंदाज सुयश शर्माने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. वेंकटेश अय्यरच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला संधी मिळाली.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर येत आहे. विजय आणि पराभवाची मालिका सुरु झाली असून गुणतालिकेचं गणित झपाट्याने बदलत आहे. नुसते गुण मिळवून फायदा नाही तर धावगतीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वच संघ यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना एकतर्फी झाला. कोलकात्याने बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीसह दिग्गज खेळाडू असूनही विजयी धावांचा पाठलाग करणं कठीण झाला. बंगळुरूचा संपूर्ण संघ 123 धावांवर बाद झाला. या सामन्यात सुयश शर्माने चमकदार कामगिरी केली.
कोलकात्याच्या संघआत मिस्ट्री फिरकीपटूंची तशी काही कमी नाही. सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती यासारखे गोलंदाज असताना आता सुयश शर्मा त्यात भर पडली आहे. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात सुयश शर्माने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून डेब्यू केलं. सुयश शर्माने 4 षटकात 30 धावा देऊन 3 गडी बाद केले. दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.
आयपीएल 2023 स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात केकेआरनं मिस्ट्री फिरकीपटू सुयश शर्माला 20 लाख रुपयात संघात घेतलं आहे. खरं तर सुयशनं यापूर्वी कधीच लिस्ट ए, फर्स्ट क्लास आणि टी 20 सामने खेळलेला नाही.सुयश शर्माला मिस्ट्री स्पिनर म्हणून बोललं जातं. सुयश लेग स्पिनर असून त्याची गुगली समजणं फलंदाजाला कठीण आहे. आरसीबी विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली.
केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सुयशच्या कामगिरीने खूश आहेत. “आम्ही सुयशची गोलंदाजी ट्रायल सामन्यात पाहिली होती. फिरकीपटू असला तरी वेगाने टाकतो आणि त्याचा सामना करणं कठीण आहे. त्याला कसलाच अनुभव नाही. पण त्याच्यात लढण्याची ताकद आहे.” असं पंडित यांनी सामन्यानंतर सांगितलं.
“बंगळुरुविरुद्ध चांगली खेळी होती. मुलांनी चांगल्या प्रकारे खेळ केला. सुरुवातीला झटपट विकेट गेल्यानंतरही 200 पेक्षा जास्त धावा केल्या. शार्दुल आणि रिंकुने चांगली फलंदाजी केली.”, असंही पंडित यांनी पुढे सांगितलं. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरुचा 81 धावांनी धुव्वा उडवल्याने कोलाकत्याला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. +2.056 च्या धावगतीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.