IPL 2023 स्पर्धेत एमएस धोनीने रचला इतिहास, चेपॉकमध्ये द्विशतक ठोकत केली मोठी कामगिरी
महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कॅप्टन ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅपियन्स ट्रॉफी भारताने जिंकली आहे. तर आयपीएलमध्ये त्याचं नाणं खणखणीत वाजलं आहे.
मुंबई – आयपीएल इतिहासात महेंद्र सिंह धोनीने मोठा टप्पा गाठला आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यात आता आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. एमएस धोनीने एकाच संघाचं 200 सामन्यात कर्णधारपद भुषविणारा पहिला खेळाडू बनला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना खेळत धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी द्विशतक ठोकलं आहे. यासाठी महेंद्रसिंह धोनीचा चेपॉक स्टेडियमवर सन्मान करण्यात आला. धोनीला चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांनी सन्मानित केलं.
धोनीने एकाच संघासाठी 200 सामन्यात कर्णधारपद भूषविलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.त्याने मुंबई इंडियन्ससाठी 146 सामन्यात कर्णधारपद भूषविलं आहे. तर या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 140 सामन्यात आरसीबीचं कर्णधारपद भूषविलं आहे. तर गंभीरने 108 सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सचं नेतृत्व केलं आहे.
धोनीला एक भेटवस्तू देण्यात आली असून त्यावर त्याचा फोटो आहे. इतकंच नाही तर 14 सुवर्ण नाणी लावण्यात आली आहेत. धोनीने 14 सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद भूषविलं आहे. चेन्नईच्या संघावर 2016 आणि 2017 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर धोनीने रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचं कर्णधारपद भूषविलं होतं.
चेन्नईने महेंद्र सिंह धोनीला 2008 मध्ये आपल्या संघात घेतलं. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर संघाने चांगली कामगिरी केली. चेन्नईने चार वेळा जेतेपद पटकावले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 9 वेळा अंतिम सामना गाठला आहे. धोनीने आयपीएलमध्ये विजयी टक्केवारी 61 टक्के आहे. धोनीने 200 पैकी 120 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.