
मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सीजनची सुरुवात तशी खास झालेली नाही. तीन पैकी पहिल्या दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध या सीजनमध्ये त्यांनी पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्ससमोर सलामीच्या जोडीचा प्रश्न आहे. रोहित शर्मा तिन्ही सामन्यात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यांच्या गोलंदाजीत सुद्धा तितकी धार दिसत नाहीय. जसप्रीत बुमराहच्या समावेशाकडे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचे डोळे लागले आहेत. कारण जसप्रीत बुमराह या टीमचा हुकूमाचा एक्का आहे. टीमला गरज असताना बुमराह नेहमीच विकेट काढून देतो. आता याच जसप्रीत बुमराह संदर्भात मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे.
जसप्रीत बुमराहच IPL 2025 मध्ये खेळणं सध्या कठीण दिसतय. त्याच्याबाबत नवीन अपडेट आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चिततेच सावट आहे. त्याचवेळी आणखी एक गोलंदाज आकशदीप 10 एप्रिलपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करु शकतो. बुमराहबद्दल आधी अशी बातमी होती की, तो 1 एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्सच्या चमूत दाखल होईल. पण आता बातमी अशी आहे की, त्याच्या कमबॅकची तारीख निश्चित नाहीय. त्याच्या टीममध्ये समावेशासाठी एप्रिलचा मध्य उजाडेल असं आता बोललं जातय.
हे संकटाला निमंत्रण देण्यासारखं
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट आहे. पण BCCI च्या मेडीकल टीमला असं वाटतं की, तात्काळ त्याचा वर्कलोड वाढवणं हे संकटाला निमंत्रण देण्यासारख आहे. त्यांनी तूर्तास बुमराहला अजून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे इंग्लंडमध्ये होणारी टेस्ट सीरीज कारण आहे. IPL 2025 नंतर इंग्लंडमध्ये ही कसोटी मालिका होईल.
दुसरा गोलंदाज कधीपर्यंत येणार?
BCCI सूत्राच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटलय की, बुमराहची दुखापत थोडी गंभीर आहे. त्याला पुन्हा स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ नये, त्याची काळजी घेतली जात आहे. बुमराह स्वत: सुद्धा त्याची काळजी घेतोय. त्याने BCCI च्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये गोलंदाजी सुरु केलीय. पण त्याला सूर गवसण्यासाठी अजून वेळ लागेल. त्याच्या पुनरागमनासाठी कुठली तारीख निश्चिच केलेली नाही. एप्रिलच्या मध्यापर्यंत तो टीममध्ये येईल असा अंदाज आहे. आकाशदीप 10 एप्रिलपर्यंत परतू शकतो, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.