इरफान पठाणसह शंभर क्रिकेटपटूंना जम्मू काश्मिर सोडण्याचे आदेश
काश्मिरमधील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इरफान पठाणसह जम्मू काश्मिरमधील शंभर क्रिकेटपटूंना राज्य सोडून इतरत्र आपला ठावठिकाणा हलवण्यास राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे
श्रीनगर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याच्यासह जम्मू काश्मिर क्रिकेट टीममधील शंभर क्रिकेटपटूंना तात्काळ राज्य सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. काश्मिरमधील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खबरदारीचा इशारा दिला होता. पठाण हा जम्मू काश्मिर क्रिकेट संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहतो.
पठाणसह जम्मू काश्मिर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिलाप मेवाडा आणि सुदर्शन वीपी यांनाही राज्य सोडून आपला ठावठिकाणा इतरत्र हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मूळ जम्मू काश्मिरचे रहिवासी नसलेल्या निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही मूळगावी जाण्यास सांगण्यात आलं आहे.
स्थानिक क्रिकेटपटूंसाठी येणारा काळ सुगीचा आहे. 17 ऑगस्टला सुरु होणारी दलीप ट्रॉफी, त्यानंतर 50 षटकांची विजय हजारे ट्रॉफी या मोसमात रंगते. रणजी करंडकाचे साखळी सामनेही 9 डिसेंबरपासून सुरु होणार असल्यामुळे क्रिकेटपटू या काळात सरावाला सुरुवात करतात. मात्र राज्याबाहेर जावं लागल्याने त्यांच्यावर अनिश्चिततेचं सावट आहे.
जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनने राज्यात क्रिकेट संबंधी सर्व उपक्रम रद्द केले आहेत. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मिर स्टेडियममधील कॅम्पमध्ये असलेल्या विविध वयोगटातील शंभर क्रिकेटपटूंना परत पाठवण्यात आलं आहे. क्रिकेट अॅक्टिव्हिटीज पुन्हा कधी सुरु करायच्या, याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल.
हिंदूचं तीर्थस्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशवादी हल्लाचं सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे. यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर तातडीने रिकामं करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सुरक्षा दलाला अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशनदरम्यान स्नायपर रायफल आढळून आल्या. त्यानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2017 मध्येही यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला
2017 मध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 32 भाविक जखमी झाले होते.